त्रिशंकू भागात होते म्हणून रस्त्याकडेच्या विद्युत खांब उपेक्षित हद्दवाढ झाल्यानंतर मीटर बसणार का?
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून होत असलेले काम पूर्णतः होणार?
शिवभक्तांचा सवाल
विशाल कदम / सातारा
किल्ले अजिंक्यताऱ्याची वाट बिकट झालेली आहे. त्याचा प्रत्यय सुमारे चार वर्षांपूर्वी पर्यटकांची ट्रॅव्हल्स दरीत गेली तेव्हा आला होता. त्याचवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी रस्ता आणि रस्त्याकडेच्या लाईटच्या काम मंजूर करून आणले. दोन वर्षांपासून रस्त्याकडेला खांब उभे आहे. खांबावर दिवे आहेत पण विद्युत कनेक्शन नसल्याने हा रस्ता अंधारात आहे.हा भाग त्रिशंकू भागात असल्याने स्ट्रीट लाईटला मीटर कोणाच्या नावाने द्यायचा हा प्रश्न होता. मात्र, आता हद्दवाढ झाली आहे. आता तरी मीटर बसणार का? पालिका लक्ष देणार का ? असा सवाल शिवभक्तांना पडू लागला आहे.
किल्ले अजिंक्यताऱ्याबाबत अनेकदा घोषणा झाल्या.पण किल्याकडे जाणारा रस्ता व किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. सध्या किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय बिकट झाला आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी मुंबई, ठाणे येथील आलेल्यांची गाडी दरीत कोसळल्याची घटना घडली होती. त्यांनंतर त्या रस्त्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा फंड टाकून काम सुरू केले.तसेच रस्त्याकडेच्या लाईटसाठी सतरा लाख रुपयांचा फंड टाकल्याचे सांगण्यात येते. त्या कामातून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यत विद्युत खांब आहेत. त्या खांबावर दिवे बसवले. परंतु विद्युत कनेक्शन नसल्याने आजपर्यंत हे दिवे अंधारात आहेत. या दिव्यांच्या प्रश्नी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांनी पंचायत समितीच्या सभेत ठराव घेतला होता. मात्र, हा भाग त्रिशंकू येत होता. त्यामुळे प्रश्न भिजत पडला होता. आता शहराची हद्द वाढली आहे. गड सगळा पालिकेच्या हद्दीत आला आहे. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या लाईट कधी लागणार, मीटर पालिकेच्या नावाने कधी बसणार असे अनेक प्रश्न शिवभक्तांना पडत आहेत.
मी आजच पत्र देतो
गेली अनेक दिवस तो प्रश्न पिचत पडला आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी काम आणल्याने पालिकेकडून व प्रशासनाकडून सापत्न वागणूक दिली जात होती. आता त्या बसवलेल्या दिव्यात लाईट यावी यासाठी मी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना आजच पत्र देतो.
-शेखर मोरे पाटील नगरसेवक
मीटर बसवण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे
सध्या कोविडचे वातावरण आहे.पालिकेचा विद्युत विभाग सुद्धा अडचणीत आहे.हे काम झाले पाहिजे याकरता माझा स्वतःचा पाठपुरावा सुरू आहे.कोविडचे रुग्ण कमी झाल्यावर मीटरचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. पालिकेकडून मीटर बसवून घेणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेले काम पूर्ण करून घेणार आहे.
-रवी पवार सामाजिक कार्यकर्ता
बापट साहेबांनी लक्ष घालावे
आता शहराची हद्दवाढ झाली आहे.उपेक्षित राहिलेला हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिला आहे. आता मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तो प्रश्न लक्ष घालून सोडवावा. आम्हा शिवभक्तांना ही अपेक्षा त्यांच्याकडून आहेत.
प्रशांत नलावडे धर्मवीर युवा मंच









