वार्ताहर / परळी
परळी खोऱ्यातील काळोशी (तालुका सातारा) येथील सुरज लक्ष्मण लामजे (वय 28) या जवानाचा लडाख (जम्मू काश्मीर) येथे हे अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली सुरज यांचे पार्थिव आज (रविवारी) सायंकाळी सातारा जिल्ह्यात आणण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसेच सैनिकी वारसाही तितकाच पाहायला मिळतो. घरातील एक तरी व्यक्ती ही देशसेवेच्या कामे यावी यासाठी नेहमी अग्रेसर असतो. काही वेळेला देशसेवा बजावतानाच काहींना प्राणास ही मुकावे लागले आहे. मूळचे कुरुन गावचे, रहिवाशी काळोशीचे सुरज लामजे हे सण २०१४ मध्ये मुंबई लष्करात भरती झाले होते. त्यानंतर बंगळूर येथे त्यांचे प्रशिक्षण झाले. सध्या ते लडाख येथे कर्तव्य बजावत होते. सुरज हे चालक असल्याने शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास सैन्यदलातील साहित्य घेऊन जात असताना त्यांचे वाहन दरीत कोसळली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हुतात्मा लामजे यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी पाच वाजता पुण्याहून सातारला आणण्यात येणार आहे. त्यानंतर लामजे यांच्या गावी नेण्यात येईल तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
हुतात्मा सुरज लामजे हे मूळ कुरून गावचे रहिवासी व काळोशी गावचे सुपुत्र घरातील आजोबा तसेच वडीलही सैन्य दलात असल्याने सैनिक वारसा हा त्यांना पहिल्यापासूनच होता. गावच्या विकासाबरोबरच गावाला जिल्ह्यात एक नवी ओळख करण्याचा त्यांचा मानस होता. हुतात्मा सुरज लामजे यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच त्यांना आठ महिन्याचा एक मुलगाही आहे. अन् त्यांच्या मुलाची अखेर समोरासमोर भेट ही कधी घडलीच नाही. सोशल मीडियाद्वारे कधी पाहणे झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मनमिळावू कर्तव्यनिष्ठ एकनिष्ठ जिल्ह्याचे सुपुत्र हरवल्याने गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. हुतात्मा सूरजला लामजे यांच्या पश्चात एक भाऊ, बहिण, आई, वडील आजी, पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे.









