प्रतिनिधी / फलटण
काटेकोर नियोजन करून सर्व प्रशासकीय कामकाजात गती द्यावी आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशा सूचना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिल्या. फलटण येथे पंचायत समितीमधील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता गावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे तसेच खातेप्रमुख, कर्मचारी, अधीक्षक उपस्थित होते.यावेळी श्री.गौडा यांनी सर्व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रलंबित 33 हजार नळ कनेक्शन देण्याबाबत नियोजन करावे. अपेक्षित खर्च आणि कामकाज याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने बैठका घेऊन नियोजन करावे. ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रमांमध्ये प्रगती करावी. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुलांचे पैकी 25% लाभार्थींना प्रथम हप्ता देणे बाकी आहे त्याबाबत ग्रामसभेचे ठराव घ्यावेत. अपूर्ण घरकुल पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी नियोजन करून मुदतीत घरकुले पूर्ण करावीत. ग्रामपंचायत कर वसुली मुदतीत होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. अपूर्ण बांधकाम विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे.तसेच नरेगा अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करावी.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सांडपाणी, घनकचरा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित एजन्सी बरोबर समन्वय साधावा आणि नियोजन करावे. खरीप आणि रब्बी पिकांचा देखील त्यांनी सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रीय बायोगॅस अंतर्गत कामे पूर्ण करण्याची त्यांनी सूचना केल्या.
कोरोना नियंत्रणाबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेऊन नियंत्रणासाठी संपूर्ण अंमलबजावणीसह जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या साह्याने रोज किमान शंभर तपासण्या व्हाव्यात, अशा सूचना करून त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आढावा घेण्याबाबत सूचना दिल्या. पेन्शन निवृत्ती प्रस्ताव व कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्ताव विहित मुदतीत वेतन पडताळणी करून सादर करावेत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हणमंतवाडी आणि खटकेवस्ती येथे भेट देऊन घरकुलांची पाहणी केली आणि झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. हणमंतवाडी अंगणवाडी भेट देऊन पाहणी केली आणि समाधान व्यक्त करून बालकांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांनी प्रशासकीय कामकाजात गती दिली जात असून सर्व कामे वेळेवर पूर्ण केली जातील असे प्रतिपादन केले.









