प्रतिनिधी/ सातारा
अखेर सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. आरोग्य विभागावरचा ताण वाढला असून संसर्ग वाढू नये व त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर येवूच नये यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर निर्णय घेत नाकेबंदी केली असल्याने सातारा व कराड ही महत्वाची शहरे आता 100 टक्के लॉकडाऊन झाली आहे. नेहमी धावणारी ही शहरे चिडीचूप झाली असून गत महिन्यातील लॉकडाऊनच्या काळात केलेल्या बेशिस्तीची ही फळे असल्याने यापुढे कडक लॉकडाऊन पाळूनच सातारा व कराडकरांना संसर्ग साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी आता नागरिकांकडून सहकार्य मिळू लागले आहे.
एप्रिल महिनाअखेरीपासून ज्या पध्दतीने सातारा जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली त्यामुळे नागरिकांना त्याचे गांभीर्य आता पटू लागले आहे. जावलीतील संसर्ग साखळी तुटल्याचे निदान आतातरी समोर येत आहे. मात्र कराड जिल्हय़ाचा हॉटस्पाट ठरल्याने जिल्हय़ाचे लक्ष कराडवर केंद्रीत झाले आहे. तेवढय़ात सातारा शहरात कोरोनाने शिरकाव केल्याने सातारकरांवर संकट घोघांवू लागले असून साताऱयात बाधितांची संख्या वाढू नये तसेच संसर्ग साखळी तयार होवू नये यासाठी दोन्ही शहरांना प्रतिबंधित करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिक घरात बसून प्रशासनाला सहकार्य करत असले तरी अनेक गैरसोयींना देखील त्यांना सामोरे जावे लागत आहे.
कराडमधील कॉटेज हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱयांना झालेला संसर्ग तर जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारीला झालेला संसर्ग गांभीर्याने घ्यावा लागणार असून प्रशासनाकडून डॉक्टर्स व नर्सेसना काळजी घेण्याचे साहित्य पुरवण्याचे गरज निर्माण झाली आहे. सध्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याने पुढील लॉकडाऊनच्या काळात सातारा व कराडकरांनी प्रशासनाला सहकार्य करत कोरोना विरुध्दचा लढा यशस्वी करण्यासाठी घरातच बसून लढावे लागणार आहे. दोन्ही शहरातील सर्व रस्ते ओस पडले असून कराडमध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी चांगले प्रयत्न सुरु असताना साताऱयात मात्र किराणा, मेडिकल, दूध या अत्यावश्यक सेवा नागरिकांना मिळण्यात अडचणी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
साताऱयात प्रतापगंज पेठ, सदरबझार, कारागृहात तर कराड शहरात कॉटेल हॉस्पिटल, वनवासमाची, आगाशिवनगर ज्या ज्या भागात बाधित रुग्ण आढळले तो सर्व परिसर प्रतिबंधित करण्यात आल्याने त्या भागात प्रवेश करण्यासाठीचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्या तरी बाहेरच पडू नये. रस्त्यावर फक्त पोलीस, बॅरिकेट्स अन मोकळे, निमर्नुष्य रस्ते या व्यतिरिक्त काहीही पहावयास मिळणार नाही.








