प्रतिनिधी / सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नातून पुर्णत्वाकडे चाललेल्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक अशा एमएसईबीच्या एक्सप्रेस फिडर लाईनच्या कामाचा शुभारंभ आकाशवाणी केंद्राजवळील एमएसईबी ऑफिस येथे पार पडला. कण्हेर पाणी पुरवठा योजना मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शाहुपुरी ग्रामपंचायत असताना या भागातील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा व्हावा म्हणून शाहुपुरी ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी काळभैरव पॅनलचे संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेर पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात यावी म्हणून प्रयत्न केले. सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यावर या प्रयत्नांना खासदार उदयनराजे यांच्या विचारांनी समाजकरण करणाऱया नगराध्यक्षा सौ माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सौ सिता हादगे, आरोग्य सभापती सौ अनिता घोरपडे, समाजकल्याण सभापती संगिता आवळे, माजी शिक्षण सभापती राम हादगे, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे व इतर सर्व सदस्यांची पण साथ मिळाली.
कण्हेर पाणी पुरवठा योजना बहुतांश पुर्ण झाली आहे. कण्हेर येथे कायम लोडशेडिंग असते. त्यामुळे तेथील उपसा केंद्रास कायम सुरळीत विज पुरवठा होऊ शकत नाही आणि विज पुरवठा वारंवार खंडीत झाला तर शाहुपुरीवासीयांना 24 तास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही हा विचार करून खासदार उदयनराजे यांनी उपसा केंद्रासाठी एमएसईबीची स्वतंत्र एक्सप्रेस फिडर लाईन टाका अशा सुचना दिल्या. त्याच कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कण्हेर पाणी पुरवठा योजना मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सांगितले. पाणी योजना पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करणारे संजय पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचे तसेच नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व त्यांच्या सर्व सहकार्यांचे शाहुपुरीतील नागरिकांच्यात कौतुक होत आहे.