प्रतिनिधी / सातारा
गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कोविड बाधितांचे रोज होणारे मृत्यू आणि राज्याच्या तुलनेत जिल्हय़ाचा जास्त असणारा मृत्यूदर ही खरी चिंता जिल्हा प्रशासनापुढे होती. मात्र डिसेंबर महिन्यात मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याचे दिसत आहे. बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार चोवीस तासात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेली व्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूची मालिका बुधवारी खंडित झाल्याने जिल्हय़ाला दिलासा मिळाला. मृत्यूसत्र आता थांबावे, अशी जिल्हावासियांची मनोकामना आहे. बुधवारी 173 नागरिक बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रात्रीच्या अहवालात 61 रूग्ण बाधित आले आहेत.
डिसेंबर महिन्यात मृत्यूंची संख्या घसरली
डिसेंबर महिन्यात गेल्या 23 दिवसांत 75 मृत्यूंची नोंद झाली आहे. ऑगस्टपासून जिल्हय़ात कोविड बाधितांच्या मृत्यूचे थैमान सुरू आहे. त्या तुलनेत डिसेंबर महिन्यात परिस्थिती सुधारल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात 280 मृत्यूंची नोंद झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात यात प्रचंड वाढ होत 746 मृत्यू झाले होते. ऑक्टोबरमध्ये 395 मृत्यू झाले असून नोव्हेंबरमध्ये 164 मृत्यू झाले आहेत. मध्यंतरी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवून प्रशासनाने व्याधीग्रस्त नागरिकांवर तातडीने उपचार केले होते. डिसेंबर महिन्यात मृत्यू कमी झाल्याचे दिसत आहे. हा गेल्या पाच महिन्यातील निच्चांक आहे. आता मृत्यूदर आणखी कमी व्हावा, अशी अपेक्षा आहे.
रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर
जिल्हय़ात रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर असून मृत्यूची संख्या कमी झाल्याने यात वाढ होत आहे. बुधवारी 173 नागरिक बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीची फिगर बुधवारी 51400 अशी होती.
नाईट कर्फ्यू महानगरांत; ग्रामीण नंदनवन फुलले
कोरोनाच्या दुसऱया स्टेंथमुळे सतर्क झालेल्या राज्य शासनाने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. याचे पालनही सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हय़ात कडाक्याच्या थंडीत महाबळेश्वर, पाचगणीकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांवर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनास सतर्क राहावे लागणार आहे.
325 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
बुधवारी 325 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले, यात जिल्हा रुग्णालय सातारा येथील 10, कराड 19, कोरेगाव 2, वाई 36, खंडाळा 2, रायगाव 13, पानमळेवाडी 120, महाबळेश्वर 10, दहिवडी 30, तळमावले 8, म्हसवड 15, तरडगाव 13 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 47 असे आहेत.
बुधवारी जिल्ह्य़ात
एकुण बाधित
एकुण मुक्त-173
एकुण बळी-00
बुधवारपर्यंत जिल्ह्य़ात
एकुण नमुने-277289
एकुण बाधित-54267
घरी सोडलेले-51400
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण-1073









