माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी / मलकापूर
मलकापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी दोन कोटींचा निधी मिळाल्याने प्रशासकीय इमारतीचे काम लवकरच पुर्ण होईल. शहरात नागरी आरोग्य केंद्र व पोलीस ठाणे व्हावे म्हणूनही पाठपुरावा उपनगराध्य मनोहर शिंदे यांच्याकडून सुरू आहे. नगरपरिषदेवर एका विचारांची एकहाती सत्ता असल्यावर शहराची प्रगती साधता येते याचे मलकापूर हे उदाहरण आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मलकापूर (ता. कराड) येथे नगरपरिषदेच्या वतीने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ना. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या प्रतिमास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ. मोहनराव कदम, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, रणजित देशमुख, डॉ. सुरेश जाधव, अजितराव पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर, इंद्रजीत चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन विकास व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, नगरसेवक सागर जाधव, जयंत कुराडे, आनंदी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एका विचारांची सत्ता नसल्यामुळे शहरात काय राजकारण होते ते आपण शेजारीच पहात आहोत. त्या तुलनेत मलकापूरमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे विकासकामे करण्यावर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व त्यांचे सहकारी नगरसेवक जिद्दीने विकासकामांसाठी निधी मिळवण्याची धडपड करत आहेत. कोरोनाही अद्याप संपला नाही. मलकापूरला नुकतेच एक कोटी रुपये निधी मिळाला आहे. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.









