सातारा : सातारा- केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी श्री. छ. वेदांतिकाराजे यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणाऱ्या सर्व जिल्हावासियांनी कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
आज दुपारी 12.15 च्या सुमारास आ. शिवेंद्रसिंहराजे वेदांतिकाराजे यांच्यासह जिल्हा रुग्णालयात गेले. त्याठिकाणी दोघांनीही कोरोनावरील लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कारंजकर, देवकर, दीपक थोरात आदी उपस्थित होते.
लस घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अजूनही या महामारीची साथ आटोक्यात आलेली नाही. पुन्हा रुग्णवाढ सुरु झाली आहे. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि कोरोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा. याशिवाय प्रत्येकाने मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच सोशल डिस्टनचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.