प्रतिनिधी / सातारा
सर्वत्र कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला आहे. जावली तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांवर उपचार होण्यासाठी मेढा ग्रामीण रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहे. या सेंटरसाठी आणि रुग्णांच्या सोयीसाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि कुटुंबाच्यावतीने ‘डिजिटल एक्स रे’ मशीन भेट देण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जावली तालुक्यातही अशीच परिस्थिती असून रुग्णांवर उपचार होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि प्रशासनाच्या निर्णयानुसार मेढा ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहे. सध्या याठिकाणी ऑक्सिजन यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान निधीची कमतरता असल्याने प्रशासनाला या कोरोना उपचार केंद्रासाठी आवश्यक असणारे ‘डिजिटल एक्स रे’मशीन घेणे शक्य होत नव्हते. ही बाब समजल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तहसीलदार पाटील यांना माझ्या कुटुंबाच्यावतीने या सेंटरसाठी ‘डिजिटल एक्स रे’ मशीन भेट देतो असे सांगितले. यामुळे मोठा प्रश्न सुटला आहे.
कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना ‘डिजिटल एक्स रे’ मशीनद्वारे त्याच्या छातीचा ‘एक्स रे’ काढला जातो. त्याद्वारे बाधित रुग्णाला निमोनिया झाला आहे का नाही अथवा बाधित रुग्ण कोणत्या स्टेजला आहे याची माहिती मिळते आणि त्यावरून पुढील उपचार वेगाने केले जातात. त्यामुळे कोविड केअर सेंटरवर ‘डिजिटल एक्स रे’मशीन असणे अत्यावश्यक असते.
मेढा येथे सुरु होत असलेल्या कोविड सेंटरसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या कुटुंबाच्यावतीने अत्यावश्यक असणारी डिजिटल एक्स रे मशीन भेट देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांची आणि वैद्यकीय पथकाची मोठी गैरसोय दूर होणार आहे. मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटर लवकरात लवकर सुरु करून रुग्णसेवेसाठी खुले करा अशा सूचना प्रशासनाला देतानाच या सेंटरसाठी कोणतीही मदत करू, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले आहे.