सातारा / प्रतिनिधी :
गोडोली हा सातारा शहरात मोडणारा भाग असून, त्याचा काही भाग त्रिशंकूमध्ये येतो. गोडोलीला प्रामुख्याने पाणी पुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जातो. तिथे पाण्याच्या समस्या आहेत. परंतु, विकास कामाच्या बाबतीतही दुजाभाव केला जातो. निधी वळवण्याचा घाटही घातला जात आहे. कचऱ्याची समस्या आहे. त्यामुळे गोडोलीतील त्रिशंकू भाग जरी सातारा शहराच्या हद्दवाढीत आला असला तरीही गोडोलीकर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज गोडोलीतील नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन दिले आहे.
गोडोली हा भाग पालिकेच्या हद्दीत येतो. परंतु गोडोलीच्या नजिकच्या साईबाबा मंदिर झोपडपट्टी, ठक्कर सिटी, शिवनेरी कॉलनी यासह काही भागाकडे जाणीवपुर्वक पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या हद्दवाढ झाली असली तरीही या भागाकडे विशेष करुन दुर्लक्ष होत आहे. या भागाला पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केला जातो. प्राधिकरणाच्या पाईपलाईनला अनेक गळत्या. त्या गळत्याही काढल्या जात नाहीत. पाण्याची टंचाई असे असताना बिले मात्र, भरमसाठ पाठवली जातात. गोडोलीकरांवर हा अन्यायच आहे. विकास कामाच्या बाबतीतही दुजाभाव केला जात आहे. अगदी मागणी करुनही निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते.
हॉटेल राजयोगच्या पाठीमागे असलेल्या विविध सोसायटींमध्ये नागरिकांनी स्वतःच्या वर्गणीतुन निधी गोळा करुन घंटागाड्या सुरु केल्या आहेत. परंतु, रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, गोडोलीतील समस्या सोडविण्यासाठी आज गोडोलीतील नगरसेवक शेखर मोरे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव मोरे, सुशांत मोरे, सौरभ भोईटे, ओमकार जाधव, जीवनकुमार काटकर आदींनी निवेदन दिले.









