काल रात्री आणखी तीन अहवाल आले पॉझिटीव्ह, ग्रामस्थांची चिंता वाढली
प्रतिनिधी / औंध
अंभेरी ता खटाव येथील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल आणखी तीनची भर पडल्याने आता एकूण बाधितांची संख्या नऊ झाली असून वाढत चाललेल्या आकड्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
अंभेरी येथील मुंबईहून आलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बाधित आला तसेच त्याचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ग्रामस्थांना धक्का बसला होता. प्रशासनाने त्याचवेळी बाधितांच्या सहवासात आलेल्या नऊ जणांना पुसेगाव येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वँबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थ हादरून गेले होते. त्यामध्ये तीन व सहा वर्षाची बालके आणि 29 वर्षीय पुरुष यांचा काल रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा नऊवर जाऊन पोहचला आहे.रात्री तीन जण पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
गावातील बांधितांची संख्या नऊवर गेली आहे. पैकी एकजण मयत आहे. अंभेरीत बाधितांची संख्या वाढल्यामुळे प्रशासन दक्ष झाले आहे. गावात दररोज निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने फवारणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्वांची थर्मल स्किरींग द्वारे तपासणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनासह स्थानिक ग्रामकमेटीने कंबर कसली आहे, मात्र प्रशासनापुढे साखळी तोडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
खटाव तालुक्यातील बाधितांच्या आकडेवारीचा आलेख वाढतच चालला आहे. आज दुपारपर्यंत एकूण बाधित 53 जण तर आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक जणांचा बळी गेला आहे.








