प्रतिनिधी/ गोडोली
किरेकोळ कारणावरुन सुरु झालेल्या वादाला जातीय रंग देत गावाच्या बदनामीपर्यंत पोहचवले. यात सातारारोड दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नाहक त्रासाने वैतागलेल्या मुस्लीम समाजाने थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदन देऊन कैफियत मांडली. त्याच सपोनि साळुंखे यांच्या विरोधात घाणेरडे राजकारण आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असल्याबाबत सातारारोडच्या नागरिकांनी पोलीस अधिक्षकांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे. वाद मिटविण्यासाठी पालीस निरिक्षक सुनिल गोडसे यांना पुढे करुन बैठक घेत चौकशीच्या ससेमिऱयाला हुलकावणी देणाऱया साळुंखेंचा डाव सातारारोडकरांनी ओळखून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
दि. 30 मे रोजी सातारारोडच्या तब्बल 102 नागरिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात सातारारोड दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्याविरोधात चांगलीच चीड व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी दूरक्षेत्राचा कारभार स्विकारल्यापासून स्थानिक मुस्लीम समाजातील कुटूंबांना नाहक त्रास देत अन्याय केल्याने दि. 18 मे रोजी पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन मांडलेल्या कैफियतेत तत्थ असल्याचे म्हटले आहे. तर याच समाजाच्या विरोधात गुंड, अवैद्य व्यवसाय करणाऱयांना हाताशी धरुन सह्यांची मोहिम राबवून वरिष्ठांची दिशाभूल करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रकार आणि प्रसारमाध्यमांना खोटी माहिती दिल्याचे म्हटले आहे. यामुळे खोटे गुन्हे, सतत चौकशीच्या ससेमिऱयाने अल्पसंख्यांक समाज दहशतीखाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सातारारोड येथील धनदांडगी, खुनशी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्यावर साळुंखे यांनी कधीच कारवाई केली नाही. मात्र, अल्पसंख्यांक मुस्लीम समाजावर सतत अन्याय करुन जातीय तेढ निर्माण केला आहे. यातून दंगल घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. स्वतःच्या समर्थनार्थ काही मुस्लीम समाजातील ज्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव, गुन्हे दाखल आहेत, असे आरेपी आणि त्यांच्या नातेवाईकांची स्तुती करणाऱया सपोनि साळुंखे यांना सातारारोडच्या नागरीकांचे समर्थन लाभणार नाही. भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी साळुंखे यांच्या कारणाम्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
वाद मिटविण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांनी सातारारोड दूरक्षेत्र येथे गावातील महत्वाच्या व्यक्तींची बैठक बोलावली. त्यात सर्व वाद मिटविण्याची तयारी दाखवून दाखल असलेल्या केसेस मागे घेतल्या जातील असे सांगितले. बैठकीनंतर संबंधितांना कोरेगाव पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही उलट दोन तास ताटकळत बसविले. पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या कार्यपद्धतीला सातारारोडकर जाम वैतागले असून पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या दोन निवेदनाच्या चौकशीतून कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
निवेदनावर अभिजीत फाळके, वनराज फाळके, चेतन मम्हाणे, मनोज माने यांच्यासह शंभरहून अधिक नागरीकांच्या सह्या आहेत.








