वार्ताहर/ एंकबे
सातारारोड (पाडळी), ता. कोरेगाव येथे घरातून शेताकडे पायी चालत चाललेल्या 66 वर्षीय चतुरा दत्तात्रय फाळके यांना रस्त्यात थांबवून, त्यांच्याशी गोड बोलत अज्ञात दोन युवकांनी 1 लाख 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले आहेत. ही घटना रविवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.40 च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की सातारारोड (पाडळी) येथील चतुरा दत्तात्रय फाळके या गोटीचा माळ मार्गे आपल्या शेतात पायी चालत चाललेल्या होत्या. सातारारोड-कोरेगाव रस्त्यावर गोविंद दूध डेअरीजवळ त्या पोहचल्या असताता, कोरेगावच्या दिशेने मोटारसायकलवरुन चाललेल्या दोन युवकांनी त्यांच्याशी गोड बोलत, त्यांची ओळख काढली. माझ्या भावाचे लग्नग्न ठरले आहे, आम्हाला सोन्याचे दागिने करायचे आहेत, सोन्याच्या बांगडय़ा कराव्यात की पाटल्या, गंठण करावे का, असे म्हणत वृध्द महिलेचा विश्वास संपादन करत त्यांना स्वत:ची खोटी ओळख सांगितली, त्याचबरोबर मी तुमच्या घरी येऊन गेलो आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते निघून गेले.
काही वेळानंतर पुन्हा दोन्ही युवक हे फाळके यांच्या शेतात थेट गेले व आजी मला तुमच्या बांगडय़ांची डिझाईन दाखवा, आम्हाला गंठण करायचे आहे, असे सांगितले. चतुरा फाळके यांनी पती दत्तात्रय यांना मोबाईलवरुन कॉल करते, असे म्हणताच, दोन्ही युवकांनी आम्हाला बाजार करायचा आहे, आम्हाला गडबड आहे, तुम्ही आमच्या मोटारसायकलवरुन घरी चला, असे म्हणत मोबाईलवरुन संभाषण होऊ दिले नाही आणि त्यांना मोटारसायकलवर बसवून घरी आणले.
घरी पोहचल्यानंतर फाळके यांनी सोन्याच्या बांगडय़ा व गंठण विश्वासाने दोन्ही युवकांना दाखविले. त्यावेळी त्यांनी रद्दीचा कागद देण्यास सांगितले. फाळके या रद्दीचा कागद आणण्यासाठी आतल्या खोलीत गेल्या, घरात कोणीही नसल्याचे पाहून दोन्ही युवकांनी सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. याप्रकरणी चतुरा फाळके यांनी फिर्याद दिली असून, त्यामध्ये 1 लाख 85 हजार रुपयांचे दागिने अज्ञात युवकांनी चोरुन नेले असल्याचे म्हटले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक कुंभार तपास करत आहेत.








