प्रतिनिधी/ सातारा
येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हय़ात आठ नगरपालिकांची निवडणूक होणार असून त्यातच आलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकाच पक्षात असलेले पण पालिकेमध्ये एकमेकांचे विरोधक असलेले दोन्ही राजे गेल्या दोन, तीन दिवसांपासून चांगलेच पेटले असून पत्रकबाजी, फलकबाजी व विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. त्यामुळे शाहूनगरीत राजकीय फटाके फुटू लागल्याने वातावरण गरम होवू लागले असताना सावधान सातारकरांनो, दोन्ही राजे पेटल्यात अशी चर्चाही रंगू लागली आहे. तेंव्हा सातारकरांना सुरू झालेल्या या राजकारणाचे गतवेळेप्रमाणे बळी न जाता विकासाचे पाईक व्हा.
ऐतिहासिक शहर असलेल्या सातारा शहराच्या राजकारणावर अपवाद वगळता राजघराण्यांचीच सत्ता राहिली आहे. स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या काळात दोन्ही राजघराण्यातील सत्तासंघर्ष विकोपाला गेला होता. त्याची परिणिती सातारकरांनी अनुभवली आहे. त्यानंतर साताऱयात तिसरी शक्ती उदयास येवू लागल्याचे पाहताच अभयसिंहराजे भोसले यांच्यानंतर त्यांची राजकीय वारसदारी सांभाळणाऱया शिवेंद्रराजे व त्यांचे विरोधक उदयनराजे भोसले यांनी मनोमीलन करुन सातारा पालिकेची सत्ता ताब्यात ठेवली होती.
त्यानंतर राजेंद्र चोरगे यांच्या रुपाने उदयास येवू शकणाऱया साताऱयातील तिसऱया शक्तीने राजकारणातून अंग काढून आपले समाजकारण भले असे म्हणत राजकारणाला राम राम ठोकला. मग दोन्ही राजांच्या गटातील कार्यकर्त्यांना भलतेच उधाण आले आणि पुन्हा नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी अशी दोन्ही राजांच्या पॅनेलमध्ये निवडणूक झाली. सातारा विकास आघाडी सातत्याने पालिकेच्या सत्तेत आहे. मागच्या निवडणुकीवेळी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत नगरविकास आघाडीकडून खुद्द राजघराण्यातील स्नुषा वेदांतिकाराजे भोसले उभ्या होत्या. त्यांचा पराभव सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम यांनी केला आणि त्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या.
पालिकेत सातारा विकास आघाडीचे बहुमत असल्याने नगरविकास आघाडीचा फारसा विरोध जाणवला नाही. आता पाच वर्षांनंतर पालिकेची निवडणूक लागलेली असून जिल्हय़ात सातारा पालिकेसह कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड आदी पालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच साताऱयात भारतीय जनता पक्षात आमदार व खासदार असलेल्या दोन्ही राजांनी नगरपालिकेच्या सत्तेसाठी युध्द आमचे सुरु असे म्हणत फलक, पत्रकवॉर सुरु केले आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडी व विरोधी नगरविकास आघाडी विकासकामे कोणी केली हे सांगत असून त्यामुळे आत्तापासून शाहूनगरीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सावधान, सातारकरांनो तेवढय़ासाठीच
राजकारणात काहीही घडू शकते असे असले तरी सध्या तरी एकाच पक्षात राहून दोन्ही राजांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे शांत असलेल्या सातारच्या वातावरणात राजकीय साठमारी पहावयास मिळू लागलीय. तीन वर्षांपूर्वी दोन्ही राजांचे गट एकमेकांना कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात सुरुचीवर भिडले. मात्र, तेव्हापासून त्यांना कायदा काय असतो व काय करु शकतो याचा दणका बसल्याने दोन्ही गट शांत होते. मात्र, दोन्ही राजांनी सुरु केलेल्या राजकीय वॉरमध्ये तेही सहभागी होवू लागलेले आहेत.








