पणजी / प्रतिनिधी
आयुर्वेदिक क्षेत्रातील 120 वर्षांहून अधिक विश्वसनीय परंपरा असलेल्या औषध कंपनी ‘साण्डू फार्मास्युटिकल्स’चे अध्यक्ष तथा प्रख्यात उद्योगपती भास्करराव गोविंद साण्डू यांचे शुक्रवार 21 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. तब्बल साठ वर्षे आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात व साण्डू फार्मास्युटीकल्समध्ये कार्यरत असलेले भास्करराव गोविंद साण्डू हे गेली 20 वर्षे कंपनीचे अध्यक्ष होते.
आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेल्या भास्करराव साण्डू यांच्या कारकिर्दीतच ‘साण्डू फार्मास्युटिकल्स’चा पसारा कैकपटीने वाढला. कर्मचारीवर्ग चारपटीने वाढला, तर कंपनीचा विस्तार देशापलीकडे अनेक इतर देशांमध्ये झाला, उत्पादन 1000 टक्क्मयांनी वाढले. चेंबूरचे सुसज्ज कार्यालय, नेरूळ येथील अत्याधुनिक कारखाना, गोव्याचा महाकाय कारखाना या गोष्टी भास्करराव यांच्या काळातच साध्य झाल्या. त्यांच्या कारकीर्दीतच साण्डू फार्माचे इथीकल डिव्हिजन सुरु करत त्यांनी अनेक आयुर्वेदिकेतर डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधांची माहिती देवून त्यांना आयुर्वेदिकाभिमुख बनविले.
मुंबई येथील पोद्दार महाविद्यालयामधून वाणिज्य पदवी घेतलेले भास्करराव ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. वडील गोविंदराव साण्डू यांच्या आदेशानुसार 1 जानेवारी 1960 रोजी वयाच्या 24 व्या वषी त्यांनी साण्डू फार्मास्युटिकल्सच्या विपणन विभागामधून कामाला सुरुवात केली. आपल्या कामात दाखवलेल्या कौशल्यामुळे कंपनीची प्रगती होत गेली व भास्करराव लवकरच कंपनीचे संचालक झाले. त्यांच्या काळातच गोवा येथे कारखाना उभारणीचे काम सुरु झाले व त्यानंतर मुंबई स्टॉक एक्सचेंजवर कंपनीची नोंदणी झाली. हे टप्पे कंपनीच्या प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचे होते व ते भास्कररावांच्या कारकिर्दीत गाठले गेले होते.
भास्करराव हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात ‘मिस्टर पोद्दार’ ठरले होते. त्यांना सुदृढ म्हणजे फीट राहण्याची आवड होती. ते पॉवरलिफ्टर होते. ते स्वतः नेहमी सुदृढ राहत व इतरांनी तसेच असावे, असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या निधनाने साण्डू कुटुंबीय तसेच साण्डू फार्मास्युटीकल्स परिवार शोकसागरात बुडाला आहे.









