होनग्याजवळ कारवाई : नियमबाहय़ वाहतूक : काकती पोलिसात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ रविवारी सायंकाळी काकती पोलिसांनी 6.675 टन स्फोटके जप्त केली आहेत. नियमबाहय़ वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. रमेश रायाप्पा लक्कोटी, राजू ईश्वर शिरगावी (दोघेही राहणार बंबलवाड, ता. चिकोडी) आणि अरुण श्रीशैल मठद (रा. मुगळी, ता. चिकोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून मॅग्झिन होल्डर विनय सुभाष किन्नवर, रा. चिकोडी याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्फोटके ताब्यात घेऊन निंग्यानट्टी येथील मॅग्झिनमध्ये ती सुरक्षित ठेवली आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी रविवारी रात्री एका पत्रकाद्वारे या कारवाईसंबंधीची माहिती दिली आहे. केए 23, बी 2509 क्रमांकाचा कँटर व केए 23, ए 8909 क्रमांकाची बोलेरो या दोन वाहनातून स्फोटकांची वाहतूक करण्यात येत होती. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार चिकोडीहून ही स्फोटके हुबळी, धारवाड व गदग जिल्हय़ात नेण्यात येत होती. चिकोडी येथील विनय ट्रेडर्स संबंधित ही स्फोटके आहेत.
क्वॉरीमध्ये जिलेटिनचा स्फोट करण्यासाठी ही स्फोटके नेण्यात येत होती. मात्र, स्फोटकांची वाहतूक करताना अनेक नियम आहेत. मानवी जीवाला धोका होऊ नये, याची काळजी घेऊन स्फोटकांची वाहतूक करण्याची गरज असते. सर्व नियम धाब्यावर बसवून मोठय़ा प्रमाणात स्फोटकांची वाहतूक केली जात होती. होनगा येथील स्फूर्ती ढाब्याजवळ ही दोन्ही वाहने अडवून पोलिसांनी स्फोटके जप्त केली आहेत. यासंबंधी चौघा जणांविरुद्ध काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.









