संभाजीनगरमधील घटना – दोघांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील संभाजीनगर परिसरात असलेल्या सिव्हिल कॉलनीतील ढाणे क्लासेसशेजारी प्रेंडस बेकरी दुकानाचे कुलूप काढून 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 11 तोळे वजनाचे सोन्याची वेढणी चोरुन नेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी महेश शंकर तडाखे (वय 18, रा. साईबाबा मंदिराजवळ, गोडोली, सातारा) व जयश्री शंकर यादव (वय 42, रा. अहिरे कॉलनी, देगाव रोड, संभाजीनगर, सातारा) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार आकाश राजेंद्र यादव (वय 26, रा. गोडोली, सातारा) यांचे संभाजीनगरमध्ये सिव्हिल कॉलनीत ढाणे क्लासेस शेजारी प्रेंडस बेकरीचे दुकान आहे. दि. 15 ते 18 जानेवारी या कालावधीत अज्ञात चोरटय़ांनी बनावट चावीचा वापर करुन दुकानाचे कुलुप काढले. दुकानात प्रवेश करुन काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दोन तोळे सोन्याची 5 वेढणी व अर्धा तोळा वजनाची 2 वेढणी असे एकूण 11 तोळे वजनाची वेढणी चोरुन नेल्याची घटना घडली होती.
यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली होती व तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. याबाबत आकाश यादव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या चोरी प्रकरणी महेश तडाखे व जयश्री यादव यांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत झाला की नाही याची माहिती घेण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होवू शकले नाहीत.








