लॉकडाऊनमुळे त्या भयानक रोगाचा संसर्ग तर टळेल. घरामध्ये राहून आपण थोडेफार सुखरूप राहू. घरात राहिल्याने एकीकडे कुटुंबातली माणसे कधी नव्हे ती अधिक जवळ आली आहेत. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही एकत्र घेतले जाते. असे पूर्वी कधी झाले नव्हते.
पण दुसरीकडे सतत घरात राहून कोंडल्यासारखे वाटते आहे. बाहेर जाताच न आल्याने एकाकी वाटते आहे. इष्टमित्र, सगेसोयरी प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत. विज्ञानाच्या कृपेने फोनवर बोलणे होते इतकेच.
आमचा मित्र हरिदास मात्र घरात बसून अजिबात कंटाळलेला नाही. मुळात त्याला व्यायामाची अजिबात आवड नाही. आयुष्यभर खवय्येगिरी हा एकच छंद जोपासला. त्यामुळे ऐन साठीत त्याने नव्वद किलो वस्तुमान कमावलेले आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर त्याच्या अर्धांगीने चपळाई करून पुरेसा अन्नधान्याचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला. प्रिय पतीने कोणत्याही निमित्ताने घर सोडू नये म्हणून ती त्याला रोज आवडीचे पदार्थ करून खिलवते. खाण्यासाठी आणि अधूनमधून जांभई देण्यासाठी तोंडाचा वापर करण्याचा कंटाळा आला की हरिदास इष्टमित्रांना फोन करून बोलण्यासाठी देखील तोंडाचा वापर करतो. परवा माझ्याशी फोनवर बोलताना त्याने मजेदार हकिकत सांगितली.
दुपारची वेळ होती. जेवण रोजच्याप्रमाणेच जडशीळ झालं होतं. हरिदास वामकुक्षी घेत होता. तेव्हा त्याला स्वप्न पडलं. वॉर्डरोबमधले कपडे एकमेकांशी बोलत होते.
शर्टने पॅन्टला विचारले, “काय गं, आठ दिवस होऊन गेले. आपण इथेच लटकलेलो. आपला मालक हरिदास आहे की ‘गेला’?’’
“काहीही अभद्र बोलू नकोस. तसं झालं असतं तर त्याच्या बायकोच्या रडण्याचा आवाज आला नसता का?’’
“खरं सांगू का? आम्हालाही अशीच शंका आलीय,’’ पलीकडच्या हँगरवर अडकवेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज एकदम बोलले.
तेव्हा तळाच्या कोपऱयात कोंबलेला एक गाऊन उठून उभा राहिला आणि खदखदा हसत म्हणाला, “तुम्ही म्हणताय तसं काही झालेलं नाही. मालक आणि मालकीण दोघेही सुखरूप आहेत. सध्या घराबाहेर पडत नाहीत म्हणून तुमची त्यांना आठवण आली नाही. पण दोघे भरपूर खादाडी करताहेत. दोघांची वजने वाढलीत. शर्टदादा, ब्लाऊजदादा आणि पॅन्टताई, तुमचं तिघांचं आता ऑपरेशन करून साईझ वाढवावी लागणार आहे. साडीताई, तुला मात्र मुळीच धोका नाही.’’
हे ऐकून साडी खुदकन हसली.








