खासगी लसीसाठी शुल्क – 1 मार्चपासून लसीकरण – 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांनाही लस देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
साठ वर्षांवरील सर्व नागरिक, तसेच 45 वर्षांवरील सर्व व्याधीग्रस्तांचे विनामूल्य लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, खासगी उपचार केंद्रांमधून लस घेतल्यास त्यासाठी किंमत द्यावी लागणार असून त्यासंबंधीचे दर लवकरच जारी करण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत एक कोटीहून अधिक आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण करण्यात आले आहे.
देशात साधारणतः 10 हजार सरकारी उपचार केंद्रे आहेत. तेथे वर उल्लेख केलेल्या वयोगटातील व्यक्तींना विनामूल्य लस देण्यात येईल. तसेच 20 हजारांहून अधिक खासगी उपचार केंद्रांनाही लस देण्याची अनुमती देण्यात आली आहे. तेथे मात्र, विनामूल्य लस मिळणार नसून त्यासाठी लाभार्थींना पैसे द्यावे लागणार आहेत. या लसीची किंमत किती असावी याचा निर्णय येत्या तीन ते चार दिवसांमध्ये केंद्रीय आरोग्य विभाग घेईल, असेही स्पष्ट करण्यात आले. हे सर्व निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आले असून त्यांची माहिती पत्रकारांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर दिली.
नागरिकांना स्वातंत्र्य
देशात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड अशा दोन लसी उपलब्ध आहेत. यापैकी कोव्हॅक्सिन ही लस पूर्णतः भारतनिर्मित असून ती भारत बायोटेक या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने निर्मिलेली आहे. तर कोव्हिशिल्ड ही लस ब्रिटनस्थित कंपनीच्या सहकार्याने ‘सीरम’ या खासगी कंपनीद्वारे उत्पादन केले जाते. या दोन्हींपैकी कोणतीही लस निवडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे. दोन्ही लसी प्रभावी आणि सुरक्षित आहेत, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. लस घेतलीच पाहिजे, असे बंधन नाही, असेही केंद्र सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत यशस्वी
आतापर्यंत एक कोटीहून अधिक आघाडीवरच्या आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण करण्यात आले आहे. ते अतिशय यशस्वी ठरले असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले. लस घेतलेल्यांपैकी अत्यल्प लोकांनी त्रास झाल्याची तक्रार केली आहे. इतर अनेक देशांना भारताने लस पुरविली आहे. त्या देशांकडूनही समाधानकारक अहवाल प्राप्त झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे.
मंत्रीही लस घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री लस घेणार का, या प्रश्नावर, प्रत्येकाला लस घेण्याचे किंवा न घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे उत्तर जावडेकर यांनी दिले. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही वक्तव्य केले. बव्हंशी केंद्रीय मंत्री लस घेतील आणि ती किंमत देऊन घेतील असे त्यांनी स्पष्ट केले
प्रथम टप्प्यात 30 कोटी लोकांच्या लसीकरणाची केंद्राची योजना आहे. या लोकांपैकी बव्हंशी लोक वृद्ध, अन्य आजारांनी ग्रस्त किंवा आघाडीवरचे आरोग्य कर्मचारी, तसेच सुरक्षा सैनिक व इतर संबंधित सरकारी कर्मचारी हे असतील. ही प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. ज्यांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार, छातीचे विकार, संधीवात अशा विकारांनी त्रस्त असणाऱयांचाही या पहिल्या टप्प्यात समावेश आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लसीकरणाला मिळणार वेग…
ड आतापर्यंत 1 कोटी 21 लाख 65 हजार 598 लोकांचे लसीकरण
ड 64 लाख 98 हजार 300 लोकांना दिला आहे लसीचा पहिला डोस
ड 13 लाख 98 हजार 400 लोकांनी घेतला आहे लसीचा दुसरा डोस
ड 1 मार्चपासून लस खासगी उपचार केंद्रांमध्येही होणार आहे उपलब्ध
ड 1 मार्चपासून लसीकरणाला देशव्यापी स्वरूप मिळून वेग प्राप्त होणार









