प्रतिनिधी/ खेड
स्वस्त किंमतीत सोने देण्याच्या आमिषाने चाकूचा धाक दाखवत 60 लाखाची लुटप्रकरणी रोशन तुरे (25, रा. दापोली) या फरारीस पोलिसांनी गजाआड केले आहे. न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह अन्य तिघेजण अजूनही फरारी आहेत.
अमर दिलीप जडय़ाळ याने 60 लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला अवघ्या काही तासातच दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर रायगड जिल्हय़ातील म्हसळा येथील जंगलातून टोळीतील 5 जणांना व अन्य एकास मंडणगड येथून अटक करण्यात आली होती. दोन लाखाच्या रोकडसह पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मुख्य सूत्रधार किशोर पवारसह चार फरारींच्या शोधार्थ पोलीस पथकांचा मुंबईतील तळ अजूनही कायम आहे. पोलीस पथके मुख्य सूत्रधारासह फरारींच्या शोधार्थ जंगजंग पछाडत असताना टोळीतील फरारी रोशन तुरे दापोली येथील घरी आल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानुसार तातडीने कार्यवाही करत पोलिसांनी त्याला घरातून जेरबंद केले. आतापर्यंत अटकेतील दरोडेखोरांची संख्या 9वर पोहचली आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.









