शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप : तहसीलदारांचे लक्ष वेधणार
प्रतिनिधी / साटेली-भेडशी:
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सोशल डिस्टन्स याबाबत प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सरपंच तथा कोरोना प्रतिबंध ग्रामस्तरीय नियंत्रण समितीने केलेल्या आवाहनाला साटेली-भेडशीतील काही किराणा मालाच्या विक्रेत्यांनी बाधा आणत शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली. याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेत सरपंच लखू खरवत व नियंत्रण समिती पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ स्तरावर या बाबत कळविण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपसरपंच सूर्यकांत धर्णे, ग्रा. पं. सदस्य प्रकाश कदम आदी समिती सदस्य उपस्थित होते. खरवत म्हणाले, लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा मालाची दुकाने सुरू आहेत. साटेली-भेडशी हे तालुक्यातील दुसरे मोठे आठवडा बाजाराचे केंद्र असून परिसरातील गावांचे एकमेव केंद्र आहे. या बाजारात या काळात होणारी गर्दी लक्षात घेत ग्रामपंचायत व्यापारी संघटना, पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेत बाजारपेठ व दुकान यांचे नियोजन करण्यात आले. मात्र, नियोजनानुसार व शासनाच्या आदेशाला न जुमानता सोशल डिस्टन्सला हरताळ फासला. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंध ग्रामस्तरीय नियंत्रण समिती निवडण्यात आली. या समितीकडूनही नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी आदेश देण्यात आले होते. तरीही याकडे काही किराणा मालाच्या व्यापाऱयांनी दुर्लक्ष करत आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार सुरुच आहे. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी बजावलेल्या आदेशाने नियंत्रण समिती काम करत असेल आणि याला जर गावपातळीवर आदेशाचे पालन होत नसेल तर संबंधित जबाबदार अधिकाऱयांनी याकडे लक्ष घालावे. त्यासोबत किराणा व्यापाऱयांनी दुकानासमोर मालाचे दरपत्रक दुकान परवाना अन्न भेसळ प्रमाणपत्र या बाबत तहसीलदारांनी लक्ष घालून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. सोशल डिस्टन्स पाळावे. बाजारपेठेत वाहनांची वर्दळ व विनाकारण फिरणाऱया नागरिकांवर नियंत्रण व कारवाई करण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करावी. त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे कर्नाटक राज्यातील या बाजारपेठेत उपलब्ध होणारी भाजीपाला सध्या तेथील कोरोना व्हायरस प्रादुर्भाव परिस्थितीच्या धर्तीवर भाज्यांचे निर्जंतुकीकरण करण्याबरोबर व्यापाऱयांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी.









