वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील नाटे-आंबोळगड परिसरात प्रस्तावित आयलॉग प्रकल्पासाठी नाटेवासीयांबरोबरच सागवे विभागातील शिवसेना पदाधिकाऱयांनीही समर्थन दिले आहे. प्रकल्पाविरोधात स्थानिकांची माथी भडकवणाऱया संस्थांना हद्दपार केले पाहिजे असा टोला लगावत नाटेवासीयांना सेना पदाधिकाऱयांनी पाठींबा दर्शवला आहे.
‘आयलॉग’ सारखा प्रदुषणविरहीत प्रकल्प स्थानिकांना हवा आहे. कोकणात कोणताही प्रकल्प आला की नेहमी तीच-तीच कारणे सांगून काही संस्था लोकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वच प्रकल्पांना विरोध होत असल्याने येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न कायम आहे. दाभोळ प्रकल्प, रत्नागिरीचा फिनोलेक्स, जयगडचा जिंदाल हे प्रकल्प विरोध झुगारून उभे राहिले. त्यामुळे तेथे रोजगार निर्माण झाला, व्यापार वाढला, राहणीमान उंचावले, सुबत्ता आली.
पूर्वी राजापूरात आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायातून मिळणाऱया उत्पन्नावर लोक समाधानी होते. परंतु अलिकडे हे व्यवसाय बेभरवशाचे झालेले आहेत. शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे येथील तरूणांना रोजगार देणाऱया प्रकल्पांची आवश्यकता आहे. त्यामुळे आयलॉग प्रकल्पासाठी शिवसेनेचे नाटे शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशे व माजी विभागप्रमुख डॉ. सुनिल राणे यांनी घेतलेल्या भूमिकेला आपले समर्थन असल्याचे सागवे शाखाप्रमुख प्रकाश पारकर, कात्रादेवी शाखाप्रमुख अरूण गुरव, कारीवणे शाखाप्रमुख विलास तांबे, शिर्से शाखाप्रमुख महेश बोटले, माजी सरपंच विद्याधर राणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास अवसरे, जिल्हा परिषद सदस्या मंदाताई शिवलकर, जेष्ठ शिवसैनिक अनंत गुरव, प्रभाकर राणे यांनी जाहीर केले आहे.
एखादा प्रकल्प जाहीर करताना त्या परिसरातील जनतेला प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिल्यास अथवा ज्या ठिकाणी तसा प्रकल्प आहे, तेथे नेऊन तो प्रकल्प दाखविल्यास नंतर प्रकल्पांना होणारा विरोध कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.









