वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सागवे ग्राम पंचायतीतील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात मुंबईस्थित ग्रामस्थांनी दंड थोपटले आहेत. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाची सततची गैरहजेरी, तिजोरीतील खडखडाट, कित्येक महिने रखडलेले ग्रा.पं.मधील कर्मचाऱयांचे वेतन तसेच अनेक विकासकामांतील गैरव्यवहार याचा भांडाफोड करीत या मुंबईकरांनी आता ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करावी यासाठी पालकमंत्री ऍड.अनिल परब यांच्याकडे धाव घेतली आहे.
सागवेचे ग्रामस्थ व मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुख संदेश खडपे, उद्योजक दिलिपभाई गोठिवरेकर, सहसंपर्कप्रमुख नामदेव नार्वेकर यांच्यासह स्थानिक सदस्य विलास गावकर, विद्या राणे, जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी देखील ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
सागवे ग्रामपंचायतीच्या सर्व खात्यांत सध्या खडखडाट असून संबंधित ग्रामसेवक सागवेमध्ये रूजू झाल्यापासून जमा खर्चाचे वाचनच केले जात नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायत सदस्यांनी केल्या आहेत. ग्रामसेवक सतत फिरतीवर असल्याने ग्रामस्थांना ग्रामसेवकाचे दर्शनच होत नाही. अनेक ठेकेदारांना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आलेले चेक्स खात्यात पैसे नसल्याने पडून आहेत. संबंधित ठेकेदारांनी पैसे वसूल व्हावेत या उद्देशाने हे चेक्स बाऊन्स केलेले नाहीत. चौदाव्या वित्त आयोगातील निधी नेमून दिलेल्या कारणांसाठी खर्च करणे बंधनकारक असताना ग्रामसेवकाने हा निधी देखील मनमानीपणे खर्च केल्याच्या तक्रारी सदस्यांच्या आहेत. आपल्या मर्जीतल्या कामांसाठी अन्य कामांचा निधी ग्रामसेवकाने खर्ची घातल्याचा आक्षेप देखील घेण्यात आला आहे.
दरम्यान सागवे मशीद कंपाऊंड वॉल, कारिवणे रामेश्वर रस्त्याचे काम, स्ट्रीट लाईट, काही नळपाणी योजनेची कामे संशयास्पद असून या कामांवर परत परत निधी खर्ची घालण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. सागवेसारखी राजापूर तालुक्यातील एकमेव मोठी ग्रामपंचायत असताना ग्रामस्थांनी मोठी ओरड केल्यानंतर याठिकाणी मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील फवारणी, शाळा निर्जंतुकीरण आदी सरपंच, ग्रामसेवक यांच्या मर्जीप्रमाणे करण्यात आले असून त्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या कामांचे मुल्यमापन करणाऱया इंजिनियरची देखील ग्रामसेवकासोबत चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळल्यास केवळ बदली न करता त्यांच्याकडून वसूली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









