ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
युवा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस हरिद्वारला रवाना झाले आहेत. सागर राणा याच्या हत्येनंतर सुशील कुमार फरार होता त्यानंतर तो हरिद्वारमध्ये पण गेला होता. दरम्यान, सुशीलला पोलीस एका आश्रमात घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार तपासा दरम्यान, सहकार्य करीत नसून त्याचा मोबाईल फोन ही अजून मिळालेला नाही आहे. त्याने फोन हरिद्वार येथे टाकला. पोलिसांना संशय आहे की त्याचा फोन हरिद्वारमध्ये आहे आणि या फोनच्या शोधासाठी पोलीस हरिद्वारला गेले आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस सुशील आणि अजय यांना घेऊन भटिंडा येथे गेली होती.
दिल्ली पोलीस सुशील कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संघटित गुन्हेगारीचे आयोजन करणार्यांवर ही कारवाई केली जाते. मोक्का लागू केल्यावर सुशील कुमारला सहजपणे जामीन मिळणार नाही. यामध्ये जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच, पोलीस 6 महिन्यांसाठी आरोपपत्र दाखल करू शकतात.
सुशिलच्या पोलीस कोठडीत वाढ
ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय शनिवारी दिल्ली न्यायालयाने घेतला आहे. मागील रविवारी झालेल्या अटकेनंतर न्यायालयाने सुशीलला चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते.
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम येथे 4 आणि 5 मेच्या रात्री सागर राणा या युवा कुस्तीपटूला सुशील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गंभीर मारहाण केली होती. त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सुशील कुमारने दोन वेळा ऑलंपिक पदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाचा सन्मान म्हणून उत्तर रेल्वेने त्याला ऑफिसन ऑन स्पेशल ड्यूटी हे पद दिले होते. मात्र, त्याच्यावर हत्येचा आरोप असून हत्येच्या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याने रेल्वेने आता त्याला नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.









