हजारो भाविकांची उपस्थिती : सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गावकऱयांकडून यात्रोत्सवाचे आयोजन

आप्पाजी पाटील /नंदगड
तब्बल वीस हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत सागरे-दोड्डेबैल येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेला बुधवारी सकाळी सात वाजता अक्षतारोपणाने सुरुवात झाली. लक्ष्मीदेवीच्या विवाह सोहळय़ासाठी व मिरवणुकीसाठी अमाप उत्साहात महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.
सागरे-दोड्डेबैल येथील लक्ष्मीदेवीची यात्रा सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. यात्रेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांनी तयारी केली होती. बुधवारी पहाटे विवाहसोहळा असल्याने दोन्ही गावांतील ग्रामस्थ मंगळवारी रात्रभर जागूनच होते. पै-पाहुणे, माहेरवाशिणी व विविध गावचे भाविक देवीच्या विवाह सोहळय़ासाठी उपस्थित राहण्यासाठी बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून दुचाकी, चार चाकी, ट्रक्टर आदी मिळेल त्या वाहनांतून सागरे गावाकडे येत होते. गावात वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून गावापासून एक किलोमीटरवर वाहने थांबविण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे गावात वाहनांची कोणतीही अडचण उद्भवली नाही.
सागरे व दोड्डेबैल दोन्ही गावचे लोक भरजरी वस्त्रे घालून लक्ष्मीदेवीच्या विवाह सोहळय़ासाठी सज्ज झाले होते. काही युवकांनी एकसारखाच गणवेश घातला होता. जसजशी पहाट होत होती तशी लक्ष्मीदेवी मंदिराकडे गर्दी वाढत होती. पहाटे चार वाजल्यापासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात येत होते. पुरोहितांच्या मंत्रघोषाने पहाटे सात वाजता देवीचा विवाह सोहळा पार पडला. लक्ष्मी देवीचा विजय असो व उदो उदोच्या घोषणा दिल्या जात होत्या. मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात भंडारा उधळण्यात येत होता. लक्ष्मी देवीच्या विवाहानंतर मंदिरासमोरील खुल्या जागेत देवीच्या मूर्तीला गोल फिरविण्यात आले.
दरम्यानच्या काळात भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरासभोवती देवीच्या प्रदक्षिणा पार पाडण्यात आल्या. त्यानंतर गावभर देवीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील मानकऱयांच्या व ग्रामस्थांच्या ओटय़ा भरण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची गदगेवर स्थापना करण्यात आली. गावच्या वेशीजवळ असलेल्या गदगा परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली आहे. यात्रा परिसरात विविध प्रकारची दुकाने मांडण्यात आली आहेत. मनोरंजनासाठी पाळणे व अन्य खेळ खेळण्यासाठी सोय करण्यात आली आहे.









