मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीने वेगाने होत आहे तोच वेग रेवस ते रेडी या सागरी महामार्गाला मिळाल्यास कोकण विकासाचा आणखी एक टप्पा पूर्ण केल्याचे समाधान मिळणार आहे.
पळस्पे ते झाराप या सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या 2-3 वर्षात पूर्णत्वास जाईल. या महामार्गालाच समांतर असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रेवस ते रेडी या सागरी महामार्गासाठीही राज्य सरकारने तब्बल 9,573 कोटीची तरतूद करत कोकणच्या पर्यटन विकासाची नव्याने तुतारी फुंकली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पर्यटनदृष्टय़ा जोडल्या जाणाऱया तीन जिल्हय़ातून जाणारा हा महामार्ग कोकणातील पर्यटन विकासासाठी वरदान ठरणारा आहे. मात्र सध्याचे महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण पाहता मुंबई-नागपूर महामार्गासारखी ‘समृद्धी’ या सागरी महामार्गाला मिळायला हवी. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर त्याला समांतर असलेल्या आणि कोकण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱया या 540 कि. मी. लांबीच्या सागरी महामार्गासाठी प्रथमच महाविकास आघाडीच्या सरकारने भरीव तरतूद करत कोकण पर्यटनावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईतील मांडवा-दिघी-जैतापूर-वेंगुर्ला-रेडी असा जात असलेला हा महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे.
रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. 3 जिल्हय़ातून जाणारा हा महामार्ग अरबी समुद्राच्या किनाऱयाने जातो. विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्र किनारे, बंदरे, मासळी मार्केट, चिपी विमानतळ आदी या महामार्गावर आहेत त्यामुळे हा महामार्ग रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ांच्या पर्यटन विकासासाठी वरदान ठरणारा आहे. या महामार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याने गेली अनेक वर्षे रखडलेल्या या मार्गाला चालना मिळणार आहे. 540 कि.मी. चा हा मार्ग दुपदरी असणार आहे. या महामार्गावरील 6 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्या पुलांना जोडरस्ते उपलब्ध नसल्याने त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग करता येत नाही. या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या व रायगड-रत्नागिरी जिल्हय़ाला जोडल्या जाणाऱया बाणकोट ते बांगमांडला या सागरी पुलाचे काम अर्धवट स्थितीत पडलेले आहे. 2013 पासून पुलाचे काम सुरू झाल्यानंतर ते अर्ध्यावरच थांबलेले आहे. गेल्या 5 वर्षात तर काहीच काम झालेले नाही. वाळूच्या टेकडीमुळे न्यायालयात गेलेला केळशी येथील पूल त्याचबरोबर दाभोळ, जयगड या मोठय़ा खाडय़ांवरील पूल उभारणीही महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. सध्या या खाडय़ात वाहतुकीसाठी फेरीबोटीचा पर्याय आहे. मात्र नव्या दुपदरी मार्गात या खाडय़ांवर पुलांची उभारणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असलेला हा महामार्ग गेल्याच वर्षी आर्थिक तरतूद केल्यानंतर राज्याने आपल्याकडे म्हणजेच राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएमआरडीसी)कडे वर्ग करून घेतला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये एकूण 24 हून अधिक लहान-मोठे पूल आहेत. हा महामार्ग वस्तीतून जात असल्याने रुंदीवर अनेक ठिकाणी मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाप्रमाणेच या नव्या मार्गाच्या बांधणीत भूसंपादनाच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि हा रस्ते प्रकल्प राज्याचाच असल्याने उद्भवणाऱया अडचणी सहजपणे दूर होणाऱया आहेत. महामार्ग वळण व उतारमुक्त करण्याचे नियोजन आहे.
एकीकडे सागरी महामार्गाला आर्थिक तरतूद करत चालना दिली जात असतानाच मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर रस्ते विकास महामंडळाने ज्याप्रमाणे नवनगरे विकसित केली त्याच धर्तीवर कोकणातही ऐतिहासिक, पर्यटन आणि उत्पादन क्षेत्राचा विचार करून या मार्गावर नवनगरे विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अलिबाग, नवीन मुरूड, नवीन दिघी, दिवे आगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या रायगड जिल्हय़ातील गावांबरोबरच दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर यांचा या विकसित होणाऱया नवनगरांमध्ये समावेश होणार आहे. म्हणजेच आतापर्यंत पर्यटनदृष्टय़ा सक्षम असणारी मात्र विकासाच्या दृष्टीने काहीशी विकसित असणारी सागरी महामार्गावरील गावे, तेथील पर्यटनस्थळांना नवा आयाम मिळणार आहे.
गेल्या कित्येक वर्षानंतर सागरी महामार्गाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला आहे. आता हा मार्ग लवकरात लवकर कसा मार्गी लागेल यादृष्टीने सरकार आणि कोकणातील लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण रखडले. तो केंद्राचा प्रकल्प असल्याचे सांगत येथील लोकप्रतिनिधीनी हात वर केले. मात्र आता सागरी महामार्ग हा राज्याचा असल्याने साहजिकच तो पूर्ण करण्याची जबाबदरी ही येथील लोकप्रतिनिधींची आणि तितकीच जनतेची आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीने वेगाने होत आहे तोच वेग या सागरी महामार्गाला मिळाल्यास कोकण विकासाचा आणखी एक टप्पा पूर्ण केल्याचे समाधान मिळणार आहे.
राजेंद्र शिंदे,








