मारवेलची लागवड करण्याचा विचार, किनाऱ्यांच्या सौंदर्यात भर घालणार एशियन डेव्हलोपमेंट बँकचे अर्थसहाय्य
प्रतिनिधी / मालवण :
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या उच्चस्तरीय व तज्ञ प्रतिनिधींनी शुक्रवारी दिवसभर देवबाग, तारकर्ली आणि वायरी या गावांमधील लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांशी साधलेला संवाद हा सागरी अतिक्रमणदृष्ट्या संवेदशनील असलेल्या गावांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग होता, असे स्पष्ट होत आहे. या कार्यक्रमांतर्गत समुद्रकिनाऱ्यांची धूप थोपवणाऱ्या मारवेलसाख्या उपजत वनस्पतींची लागवड करण्याचा उपक्रमही हाती घेण्याचा मानस आहे. परंतु याविषयीची अधिकृत माहिती देण्यास बंदर विभागाने असमर्थता दर्शविली.
प्राप्त माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हय़ातील गणपतीपुळे येथेही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱयांसमवेत स्थानिक रहिवाशांची अशाच प्रकारची बैठक झाली. या बैठकीत गणपतीपुळे किनाऱ्याची धूप थांबविणे, किनारा अधिक सुरक्षित करण्याबरोबरच तेथील सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने समुद्रात दोनशे ते तीनशे मीटरवर ‘रिब्स’ बांधण्याची योजना हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. देवबाग, तारकर्ली, वायरी येथील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत शनिवारी झालेला प्राथमिक संवाद हाच याच अनुषंगाने होता. या तीन गावांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अर्थसहाय्यातून किनारपट्टी संरक्षणाचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. तत्पूर्वी त्यांनी स्थानिकांची मते जाणून घेतली आहेत. लवकरच स्थानिकांचा सहभाग असलेली एक समितीसुद्धा स्थापन केली जाणार आहे. मालवणातील सागरी अभयारण्याच्या नकाशाचाही या समितीने अभ्यास केला. आपल्या उपक्रमामध्ये कुठल्याही सागरी अभयारण्याच्या सीमांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, याची काळजी तज्ञांकडून घेतली जात आहे. दरम्यान, सागरी अतिक्रमण गावांसाठी बंधारा घालण्याची योजना असेल तर सर्वप्रथम अंडरवॉटर सर्वे करण्यात यावा, अशी सूचना या टीमला करण्यात आली आहे.
मच्छीमारांना विस्थापित करून प्रकल्प नको – स्नेहा केरकर
तारकर्ली खाडी व समुद्रकिनारी संरक्षक बंधारा कम रस्ता, खाडीतील गाळ काढणे, कचरा व्यवस्थापन, सीआरझेडमुळे होणाऱया त्रास, मच्छीमार गाव अथवा कोळीवाडा जाहीर करणे याविषयांवर सदर पथकासमवेत चर्चा झाली. पारंपरिक रापणकर संघ व स्थानिक छोटे मच्छीमार विस्थापित होणार नाहीत, याची दक्षता घेऊनच कुठलेही प्रकल्प हाती घेतले जावेत. सागरी अतिक्रमणामुळे तारकर्ली समुद्रकिनारा भविष्यात नाहीसा होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत तसेच जनसुनावणी घेऊनच प्रकल्प सुरू करण्यात यावे, अशी मागणी आम्ही पथकाकडे केल्याचे तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी तारकर्ली ग्रामस्थ सुरेंद्र केळुसकर, दाजी सारंग, विश्राम खराडे, सतीश टिकम, किरण रोगे, कपिल खराडे, आना कुबल, ताता केळुसकर, कमलेश बांदेकर ग्रा. पं. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर आदी ग्रामस्थ तारकर्ली बंदर जेटी येथे उपस्थित होते.