प्रतिनिधी/ फोंडा
भाऊसाहेब बांदोडकर जयंतीनिमित्त आडपई येथील उदयोन्मुख चित्रकार सागर नाईक मुळे यांनी आपल्या लहानपणातील आठवणीतील शाळा चित्रकलेच्या माध्यमातून साकारून भाऊसाहेबांना 110 व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. मडकई भागात बंद पडलेल्या शाळामध्ये सागरच्या बालपणीच्या आठवणींची शाळेचाही समावेश आहे. त्याच बंद पडलेल्या शाळेच्या आपल्या वेदना त्यांनी कॅनव्हासवर उत्तमरित्या उमटविल्या आहेत.
सागर नाईक मुळे याचे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण वस्तवाडा आडपई येथे झालेले असून सदर शाळा सन 2014 पासून बंद झालेली आहे. कमी हजेरीपटाच्या कारणामुळे बंद करण्यात आल्याचे कारण देण्यात आले असून आज या शाळेची परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहेत. सागरच्या मनात आजही आपल्या शाळेविषयी गोड आठवणी आहेत. शाळेत भेटलेले पहिले मित्र, शाळेतील मातीतले खेळ हे केवळ स्वप्नवत गोष्टी ताजा केल्या आहेत. भाऊसाहेब प्रतिमेसह आडोशात बॅकग्राऊडमध्ये आपल्या बंदावस्थेतील शाळा कॅनव्हासवर साकारली आहे. आडपई येथील शाळेत आजही बाहेरून खिडकितून डोकावल्यास फळय़ावरती विश्वप्रार्थना, सुविचार अगदी सुवाच्च अक्षरात नजरेस पडतात.
सरकारी शाळेला प्रथम प्राधान्य
आज बहुतेक पालकांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचा अट्टहास असतो. मात्र सागरने आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत न घालता सरकारी मराठी शाळेत प्रवेश देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पण यासाठी गावात सद्या एकही सरकारी शाळेत वर्ग सुरू नाहीत, त्यासाठी त्याला अडूळशे येथे सुमारे 4 किलोमिटर अंतरावरील सराकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे, तीही त्यांनी तयारी ठेवलेली आहे. भाऊसाहेबांच्या 110 व्या जयंती साकारताना त्याने आपल्या शाळेची झालेली अवस्था मांडलेली आहे. भिंतीवर वारूळे उगवली आहे. भाऊसाहेब दुरदृष्टी असलेले नेते होते. त्याच्या शैक्षणिक दुरदृष्टीमुळेच गोव्यात अनेक गरीब कुटूंबातील लोक शिकू शकले. शाळेजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या आज सुकलेल्या असून नेमके तेच त्याने त्याच्या पेंटींगमधून व्यक्त केले आहे. चित्र साकारताना माती, पेन व एक्रीलीक रंगाचा वापर केला आहे.
प्राथमिक शाळेलागूनच माध्यमिक शाळा झाल्या असत्या तर…..
गावातील सरकारी प्राथमिक शाळा का बंद पडू लागल्या हा खराच चिकित्सेचा विषय आहे. सरकारी शाळेलगतच एखादा खासगी संस्थेला प्राथमिक वर्ग सुरू करण्याची परवानगी कशी काय देण्यात येते. आज आपले पालकही तेवढेच जबाबदार आहेत. सरकारचही उदासिन धोरण याला जबाबदार आहे, प्राथमिक शाळा केवळ पहिली ते चौथीपर्यंत मर्यादीत राहिल्या. माध्यामिकासाठी दुसरीकडे सोय करण्यात आली त्यामुळेही आज सरकारी प्राथमिक शाळांना गळती लागण्याचे कारण असू शकते असा विचार सागर यांनी व्यक्त केला आहे. सरकारने माध्यमिक शाळा सुरू करताना प्राथमिक शाळांचा विचार केला असता आज सर्व शाळा शाबूत राहिल्या असत्या असाही विचार त्यांनी मांडला आहे. भाऊसाहेबांच्या 110 व्या जयंतीदिनी पाटनतळी येथे आमदार सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते त्याच्या पेंटींगचे अनावरण होत आहे.









