डिचोली/प्रतिनिधी
साखळी रवींद्र भवन परिसरात गांजाची डिल करण्याच्या नादात असलेल्या एका मूळ उत्तर प्रदेश राज्यातील आणि साखळी हाऊसिंगबोर्ड परिसरात राहणाऱया युवकाला 803 ग्रेम गांजासह डिचोली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. सदर जप्त करण्यात आलेला गांजा 1 लाख 60 हजार 60 रूपयांचा असून या गांजासह ताब्यात घेण्यात आलेल्या बलवीर विश्राम चव्हाण (वय 36) याला अटक करून पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
बुध. दि. 25 नोव्हे. रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास डिचोली पोलिसांनी पोलीस उपअधिक्षक गुरूदास गावडे यांच्या देखरेखीखाली आणि डिचोलीचे पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर छापा मारला. रात्री 8 वा. च्या सुमारास डिचोली पोलिसांना गुप्त सूत्रांकडून साखळी रवींद्र भवन परिसरात अंमली पदार्थांची डिल होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डिचोली पोलिसांनी रवींद्र भवन परिसरात सापळा रचला.
या छाप्यात पोलीस उपअधीक्षक गुरूदास गावडे व निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रजित मांदेकर, पोलीस कॉन्स्ट?बल गौरव वायंगणकर, देवराय कारबोटकर, रणधीर बाले, रोहन गावस यांनी साखळी रवींद्र भवन परिसरात सापळा रचला. ठरल्यानुसार गांजा आपल्या पारंपरिक ग्राहकांना विकण्यासाठी आलेल्या संशयित बलवीर विश्राम चव्हाण याला एका बेगसह ताब्यात घेतले. सदर बेगेची पूर्णपणे झडती घेतली असता त्यात मोठय़ा प्रमाणात गांजा आढळून आला.
पोलिसांनी सदर बेगसह संशयित बलवीर चव्हाण याला ताब्यात घेतले. बेगमधील गांजाचे वजन करण्यात आले असता तो 803 ग्रेम असल्याचे आढळून आले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे 1 लाख 60 हजार 600 रू. इतकी होते. या संपूर्ण कारवाईनंतर उपनिरीक्षक प्रजित मांदेकर यांनी या प्रकरणातील संशयित व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल उपनिरीक्षक दिपेश शेटकर यां?च्या स्वाधीन केला. उपनिरीक्षक दिपेश शेटकर यांनी याप्रकरणी रितस रगुन्हा नोंद करीत संशयिताला अटक केली. त्याला डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात सादर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक शेटकर हेच अधिक तपास करीत आहे. या कारवाईबध्दल पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्यासह उपनिरीक्षक व संपूर्ण पोलीस पथकाचे पोलीस उपअधीक्षक गुरूदास गावडे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. तर निरिक्षक महेश गडेकर यां?नी अशा प्रकारची कारवाई याहीपुढे डिचोली पोलीस कार्यक्षेत्रात चालूच राहणार, असे सांगितले.









