नवीन हंगामातील पहिल्या पंधरवड्यात गाळप घटले
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
गळीत हंगाम सुरु करण्याची वेळ आली की एफआरपी वरुन आंदोलने ठरलेली. पण यंदापासून कारखानादारी समोर मशीनच्या ऊस तोडीवरुन आंदोलनाचा नवा प्रश्न तयार झाला आहे. पाच टक्के वजावट बंद करा, अशी मागणी करीत शेतकरी संघटना ऊसतोडी बंद पाडत आहेत. तर दुसर्या बाजुला पुरेसा मजुर नसल्याने गाळप पूर्ण क्षमतेने सुरु नाही. मशीन तोडी बंद, मजूरही नाहीत, अशा दुहेरी संकटात यंदाचा गळीत हंगाम सापडला आहे. यामुळे अद्याप जिल्ह्यातील पाच ते सहा कारखाने सुरु झालेले नाहीत. त्यामुळे मार्ग काढायचा कसा? या टेन्शनखाली कारखानादार आहेत.
मागील काही हंगामात ऊसतोड मजुरांच्या फसवणुकीमुळे वाहनधारक अडचणीत आले. काहींनी मजुरांना दिलेली उचल वसुल झाली नाही. त्यातुन बँकांची कर्जे थकीत गेली, वाहने लिलावात निघाली या तणावातून वाहनधारक शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. केवळ आणि केवळ याच कारणाने कोल्हापूर विभागात अलीकडच्या काळात पाच ते सहा जणांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. फसवणुकीचे प्रमाण वाढू लागल्याने बहुतांशी शेतकऱयांनी टोळ्या बंद केल्या.
मजुरांच्या टंचाईवरील पर्यायही संकटात
मजुरांच्या टंचाईवर मशीनचा पर्याय पुढे आला. शेतकर्यांनी कर्जे काढुन मशिन घेतल्या. आतापर्यंत कोल्हापूर विभागात 164 मशिन कार्यरत आहेत. मशिननेच तोडलेल्या उसाचे वाहन कारखान्यात गेल्यानंतर लगेच वजन होत असल्याने शेतकर्यांनी अशा तोडीला पसंती दिली. मात्र मशीनद्वारे तोडलेल्या उसाला टनाला पाच टक्के वजावट कारखान्यांकडून सुरु झाली. गत वर्षी काही शेतकरी संघटनांनी हा मुद्दा घेऊन आंदोलन सुरु केले. साखर आयुक्तांनीही वजावट करु नये, असे आदेश काढल्याने संघटनांनाही बळ मिळाले. मात्र अंमलबजावणीच्या पातळीवर हा आदेश टिकला नाही. बहुतांश कारखान्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे.
..तर जिल्हाभर लोन
जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांकडून मशीन तोड उसाची वजावट सरसरसकट पाच टक्के सुरु असल्याचा दावा काही शेतकरी संघटना करत आाहेत. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. हा मुद्दा दोन वर्षांपासून ऐरणीवर आला. कपात 5 ऐवजी 1 टक्का करावी, ही मागणी घेऊन सध्या शिरोळ तालुक्यात आंदोलनाची ठिणगी पडली आहे. परिसरातील गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा, दत्त इंडिया कारखान्यांची वाहने रोखली जात आहेत. जिल्ह्याच्या एका कोपर्यात हे आंदोलन सुरु असले तरी हळुहळू याचे लोन जिल्हाभर पसरु शकते.
मजुर टंचाई..
यंदा ऐन दिवाळीत हंगाम सुरु झाल्याने पहिल्याच पंधरवड्यात कारखान्यांना पुरेसा ऊस मिळाला नाही. कोल्हापूर विभागात 41 कारखाने आहेत. आतापर्यंत प्रत्येक कारखान्याला सरासरी अडीच हजार जोडपी ऊस तोडणीसाठी लागतात. विभगाचा विचार करता सरासरी दीड ते दोन लाख कामगारांची गरज आहे. मात्र आतापर्यंत एक लाख 15 हजार मजुरांची नोंद कारखान्यांकडे झालेली आहे. प्रत्यक्षात अजून काही कामगार वाटेत आहेत. ते कामावर येऊन तोडणी सुरु होण्यास किमात आठ ते दहा दिवस लागणार आहेत. या परिस्थितीत मशिन तोडी बंद पडू लागल्याने पूर्ण क्षमतेने कारखाने सुरु होणार नाहीत, त्यामुळे कारखानादारांपुढील चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील शाहू कागल, दत्त शिरोळ, मंडलिक हमीदवाडा, केन ऍग्रो या कारखान्यानी साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करुन कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कारखान्यांना जमते, इतरांना का नाही?, अशी विचारणा शेतकरी नेते करत आहेत.
कायद्याची अंमलबजावणी करा
कायद्याने 1 टक्का कपात घेता येत असताना कारखाने बेकायदेशीररित्या 5 टक्के कपात लावून शेतकर्यांना लुटत आहेत. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही कारवाई झालेली नाही. साखर आयुक्तांच्या आदेशालाही कारखाने केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव तोडी बंद पाडव्या लागत आहेत.
– धनाजी चुडमुंगे, संस्थापक, आंदोलन अंकुश









