वार्ताहर/ ताम्हाने
देवरुख-साखरपा मार्गावरील साखरपा खिंडदरम्यान एसटी आणि अल्टो कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील देवडे क्र.2 शाळेचे शिक्षक संदीप कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
बसचालक तुकाराम माधव फोले (38) हे देवरुख-साखरपा ही गाडी घेऊन जात होते. तर साखरप्याहून देवरुखकडे जात असताना संदीप दत्तात्रय कांबळे (48, साखरपा) यांच्या अल्टो कारची बसला समोरुन जोराची धडक बसली. या अपघातात कारमधील विजयमाला संदीप कांबळे (42), शंकर कल्ला बोरडे (57), सरस्वती शंकर बोले (47) हे गंभीर जखमी झाले. संदीप कांबळे यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे नेत असताना त्यांचे निधन झाले. संदीप कांबळे हे साखरपासह संपूर्ण परिसरातील आदर्श शिक्षक, क्रीडा जाणकार, कलाकार असे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व होते.
त्यांचे मूळगाव कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडी. परंतु अनेक काळापासून ते साखरप्यामध्येच वास्तव्याला होते. ते रत्नागिरी जिल्हा कब्बडी असोसिएशनचे राज्यस्तरीय स्पर्धा उत्तीर्ण असे पंच होते. अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये त्यांनी पंचगिरी केली होती. तसेच त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारसुद्धा मिळाला होता. ते शिक्षण व क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये हिरीहिरिने सहभागी होत असत. विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती.









