बुधवारी 52 निगेटिव्ह अहवाल प्राप्त अद्याप 27 अहवाल प्रलंबीत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील 52 संशयित रूग्णांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे यापुर्वी कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या साखरतर येथील दोन्ही रूग्णांचे अहवालही निगेटीव्ह आल्याने प्रशासनासह जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता एकूण 27 अहवाल प्रलंबीत आहेत.
रत्नागिरीत जिल्हय़ात आजपर्यंत 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सर्वात पहिला रूग्ण पूर्णपणे बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर खेडमध्ये दुबईहून परतलेल्या एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. उर्वरीत 4 रूग्ण रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील राजीवडा येथील रूग्णाचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आल्याने त्याला एमआयडीसी विश्रामगृहावर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आता साखरतर येथील दोन्ही महिलांचे अहवालही निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या रूग्णांच्या सहा महिन्यांचा नातूही कोरोना पॉझीटीव्ह म्हणून उपचार घेत असून त्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या बालकाचा अहवालही निगेटीव्ह येईल असा विश्वास वैद्यकीय अधिकाऱयांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
मृताच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटीव्ह
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या खेड तालुक्यातील अलसुरे येथील रूग्णाच्या नातेवाईकांचे अहवल निगेटीव्ह आले आहेत. या रूग्णाच्या 50 नातेवाईकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यातील 40 अहवाल बुधवारी सकाळपर्यंत तर 10 अहवाल सायंकाळी प्राप्त झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हय़ातून आतापर्यंत 496 अहवाल पाठवण्यात आले असून त्यातील 461 अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. 6 जण आतापर्यंत कोरोना पॉझीटीव्ह आढळले असून 2 स्वॅब नाकारण्यात आले आहेत. एकुण 27 अहवाल अद्याप प्रलंबीत आहेत. होम क्वारंटाईनची संख्या 1118 तर संस्थात्मक क्वारंटाईनची संख्या 443 आहे.
जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची अधिकृत संख्या सहाच
सरकाच्या अधिकृत वेबसाईटवर जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8 दाखवली जात असून काही वृत्तवाहिन्यांनीही जिल्हय़ात 8 कोरोनाग्रस्त असल्याचे वृत्त प्रसारीत केले होते. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र, जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची अधिकृत संख्या सहाच असल्याचे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मुंबईतील कांदीवली भागात राहणारी 26 वर्षीय तरूणी कोरोना पॉझीटीव्ह आढळली आहे. 2 वर्षांपासून मुंबईतच राहणाऱया या तरूणीने संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील मुळ पत्त्याची नोंद केली आहे. त्याचबरोबर वरळी येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 10 वर्षापासून राहणाऱया 24 वर्षीय कोरोना पॉझीटीव्ह तरूणानेही आपला पत्ता फुणगूस येथील दिला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर जारी केलेल्या आकडेवारीत रत्नागिरी जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8 दिसत आहे. तथापी जिल्हय़ात अधिकृतपणे 6 रूग्णच कोरोना पॉझीटव्ह असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.









