प्रतिनिधी/पणजी
गत सुमारे 17 वर्षांपासून शिरडीतील श्रीसाईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी, निस्सीम साईभक्त, लेखक, साहित्यिक असलेले मोहन यादव यांचे अल्प आजाराने शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी रात्री उशिरां निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.
गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तब्बेत अधिकच खालावल्यामुळे उपचारांना दाद न देता रात्री उशिरां त्यांची प्राणज्योत मालवली.
वर्ष 2004 पासून श्रीसाईसंस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली. त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के. व्ही. रमणी यांनी संस्थानला 110 कोटीच्या देणगीतून साईआश्रम प्रकल्प बांधून दिला. त्यातील काही इमारतीत सध्या कोरोना इस्पितळ सुरू आहे.
अत्यंत मनमिळावू व नम्र स्वभावाच्या यादव यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी त्यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठय़ा देणग्या मिळवून दिल्या.
यादव यांनी लिहिलेल्या श्रीसाईचरित्र दर्शन या पुस्तकाचा गोव्यातील कोंकणीसह सुमारे 12 भाषांतून अनुवाद झालेला आहे. यादव यांच्या पश्चात पत्नी रेखा, पूत्र ओंकार व कन्या श्रद्धा असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे साईसंस्थान समितीने दुःख व्यक्त केले असून संपूर्ण शिरडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









