के. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित के. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने अटीतटीच्या लढतीत अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सचा केवळ 1 धावेने निसटता पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 20 धावा व 4 गडी बाद करणाऱया अष्टपैलू संतोष सुळगे-पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सोमवारच्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने20 षटकात 5 बाद 172 धावा केल्या त्यात कर्णधार नागेंद्र पाटील 47, नरेंद्र मांगुरेने नाबाद 40, शुभम भादवणकरने 25, संतोष सुळगे-पाटील 1 षटकार, 2 चौकारासह नाबाद 20 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे रोहितकुमार ए. सी., जिनत मुडबागील, वसंत शहापूरकर, मुदस्सर नजिद यांनी प्रत्येकी गडी बाद केला.
प्रत्युत्तरात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने 20 षटकात सर्व बाद 171 धावाच केल्याने त्यांना हा सामना 1 धावेने गमवावा लागला. त्यात मिलींद चव्हाणने 64, प्रसाद सुगुरने 34 तर स्वप्नील येळवेने 20 धावा केल्या. साईराजतर्फे संतोष सुळगे-पाटीलने 27 धावात 4, नरेंद्र मांगुरेने 46 धावात 2, भरत गाडेकरने 28 धावात 2 तर शुभम भादवणकरने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे साईल खोजा, नासिर पठाण, उमर पठाण, राघवेंद्र कडलगी यांच्यातर्फे उत्कृष्ट झेल नंदन शिंदे, सर्वाधिक षटकार नरेंद्र मांगुरे, इम्पॅक्ट खेळाडू मिलींद चव्हाण, सामनावीर संतोष सुळगे-पाटील यांना चषक देऊन गौरविण्यात आले. मंगळवारी अंतिम सामना झेवर गॅलरी विरुद्ध साईराज वॉरीयर्स यांच्यात सकाळी 10 वाजता खेळविण्यात येणार आहे.









