पत्रकार, फौंड्री क्लस्टर, हेस्कॉम, पोलीस स्टेशन उपांत्य फेरीत
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित सातव्या साईराज चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील उद्घाटनादिवशीच्या सामन्यात पत्रकार, हेस्कॉम, फौंड्री क्लस्टर, टिळकवाडी पोलीस स्टेशन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, राजेश जाधव, राजेश हेडा, विजय भंडारी, गजानन कजारिया, संजय कडोलकर, पुरस्कर्ते महेश फगरे, हेस्कॉमचे प्रमुख अभियंते विनोद कोरूर, गजानन फगरे, भाऊ फगरे, नारायण फगरे, नंदू मिरजकर, उत्तम शिंदे, महेश सुतार, अमर नाईक, युवराज हुलजी, रोहित पोरवाल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नारायण फगरे यांनी केले. मैदानाचे पुजन मल्लीकार्जुन जगजंपी यांनी केले. यष्टीचे पूजन संजय कडोलकर व विजय भंडारी यांनी करून स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिल्या सामन्यात क्रीडाई संघाने 8 षटकात 5 बाद 73 धावा केल्या. त्यात रोहित पोरवालने 37 धावा केल्या. पत्रकार संघातर्फे विनायकने 2 तर चंद्रकांत पाटील व राकेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पत्रकार संघाने 7.3 षटकात 2 बाद 75 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. सारंग राघोचेने 34, राकेशने 22 तर विनायकने 15 धावा केल्या. दुसऱया सामन्यात आधार सोसायटीने 8 षटकात 6 बाद 47 धावा केल्या. त्याला उत्तर देताना हेस्कॉमने 6 षटकात 4 बाद 48 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला.
तिसऱया सामन्यात फौंड्री क्लस्टरने 8 षटकात 5 बाद 95 धावा केल्या. त्याला उत्तर देताना महानगरपालिका संघाने 8 षटकात 5 बाद 74 धावाच केल्या. चौथ्या सामन्यात टिळकवाडी पोलीस संघाने 8 षटकात 4 बाद 105 धावा केल्या तर सीटी इंजिनियर संघाने 8 षटकात 74 धावाच केल्या.
बुधवारी पहिला उपांत्य सामना पत्रकार इलेव्हन वि. फौंड्री क्लस्टर यांच्यात सकाळी 8.30 वा. तर दुसरा उपांत्य सामना टिळकवाडी पोलीस वि. हेस्कॉम यांच्यात 12.30 वा. होणार आहे.









