नोकरी केल्याचा दावा : तीर्थक्षेत्रासाठी 100 कोटी देण्याची मागणी
बीड, पुणे / प्रतिनिधी :
साईबाबांच्या जन्मस्थानावरून पाथरी विरुद्ध शिर्डीकरांचा वाद सुरू झाल्यानंतर आता साईबाबा कुठे कुठे वास्तव्यास होते, याचाही शोध घेतला जात आहे. साईबाबा हे पाथरीहून औरंगाबादमार्गे शिर्डीला असताना काही काळ बीडमध्ये वास्तव्यास असल्याचीही माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे, तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे येथेही तीर्थस्थळ म्हणून विकासासाठी शंभर कोटी देण्याची मागणी केली जात आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळासंदर्भात एकूण 27 पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्यातील एका पुराव्यातून ही माहिती पुढे आली असून, त्याचाच संदर्भ घेत आता बीडकरही पुढे सरसावले आहेत. साईबाबांच्या प्रवासामध्ये बीड हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचे बीडकर सांगत आहेत. साईबाबा बीडमध्ये असल्याचा उल्लेख साईचरित्रात आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितले होते, की साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती. एवढा असामान्य माणूस अशाप्रकारे लाज न बाळगता काम करतो, हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे साईभक्त पाटणकर यांनी सांगितले.
पाथरीत जन्म हीच खरी वस्तुस्थिती
कीर्तनकार भरतभाऊ रामदासी म्हणाले, साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आहे. अवलिया गुरुसोबत ते फिरत-फिरत बीडमध्ये आले होते. साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते, असे संत एकाजागी कधी थांबत नाही. दासगणू महाराजांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरू केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले. याठिकाणी त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेतले. तिथून ते शिर्डीला गेले. शिर्डीचा आर्थिक खूप विकास झाला. मात्र पाथरी उपेक्षित राहिली. साईबाबांचा पाथरीत जन्म झाला, हीच खरी वस्तुस्थिती आहे.









