प्रशासनाची सशर्त परवानगी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मागील वर्षीच्या लॉकडाऊनपासून सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे मोठ आर्थिक नुकसान झाल्याने कार्यक्रम सुरू करण्यास परवानगीच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे आता 50 व्यक्तींच्या मर्यादेत व कोविड 19 संदर्भातील सर्व प्रतिबंधीत उपाययोजनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱयांनी तसे लेखी आदेश दिले आहेत.
कोविड-19 काळात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहिल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या सर्व कलाकारांचे हाल झाले आहेत. यासाठी शासनाचे मर्यादित स्वरुपात नाटक, नमन, ऑकेस्ट्रा, डान्स पोम आदी कार्यक्रम सादर करण्यास परवानगी द्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझरचा, मास्क आदी सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन देत कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी कोकण नमन लोककला मंच, महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय नाटय़ परिषद, डान्स ऍकॅडमी, भजनी मंडळ संस्था अशा जिल्हय़ातील संघटनांच्याच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी प्रशासनाकडेही निवेदन देण्यात आले. या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकाऱयांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी नियमावली घालून दिल्याचे आदेश शुक्रवारी 19 मार्च रोजी काढले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमधारकांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर किंवा रॅपीड ऍन्टीजेन चाचणी करून घ्यावी. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम करावे. कोविडसदृश लक्षणे असल्यास कोणत्याही नागरिकांस कार्यक्रमात सामील करून घेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमधारकांनी 50 पेक्षा जास्त लोकांनी गर्दी होणार नाही, यांची दक्षता घ्यावी. आदेशाचे उल्लंघन वा कोरोनाचा शिरकाव दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतानाच वेळोवेळी दिल्या जाणाऱया अन्य सूचनांचेही पालन करावे लागणार आहे. याचवेळी दिलेली परवानगी रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. परिसर स्वच्छता, कार्यक्रमाचा कालावधी, कार्यक्रम सादरीकरणासाठी रात्रौ 10 वाजेपर्यंत पूर्वपरवानगी आदी अटी आदेशात देण्यात आल्या आहेत. या बाबतची परवानगी संबधित उपविभागीय अधिकारी स्तरावरून प्राप्त करावी लागणार आहे.
कार्यक्रमधारकांस ये-जा करण्यासाठी मिळणार सवलत
सांस्कृतिक कार्यक्रमधारकांना कार्यक्रम सादरीकरणासाठी प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान पोलिसांच्या चौकशीला समोर जाण्याची वेळ येते. कार्यक्रम वेळेत संपला तरी ये-जा करण्यासाठी रात्री उशिर होऊ असतो. अशावेळी कार्यक्रम संपल्यानंतर घरी ये-जा करण्यासाठी परवानगीपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.