प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा विमानतळावर शनिवारी सामूहिक अग्निहोत्र करण्यात आले. विनायक लोकूर यांच्या पुढाकाराने 20 हून अधिक जणांनी हे अग्निहोत्र केले. मात्र, विमानतळावर अग्निहोत्र करणे कितपत योग्य आहे, याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या नेतृत्त्वाखाली हा अग्निहोत्र विधी शनिवारी सायंकाळी पार पडला.
वातावरण शुद्धीसाठी अग्निहोत्र अतिशय उपयुक्त ठरते. देशामध्ये फार पूर्वापार काळापासून हा विधी करण्यात येतो. विमानतळ टर्मिनल इमारत आणि परिसरातील वातावरण शुद्ध राहावे या हेतूने हा विधी केल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. मात्र, हा एक धार्मिक विधी असून तो ठराविक धर्मापुरताच मर्यादित असल्याचा विरोधी सूरही उमटू लागला आहे. याबाबत राजेशकुमार मौर्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अग्निहोत्र हा पूर्णतः वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेला विधी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्निहोत्रचे महत्त्व मान्य केले आहे. सध्याच्या कोविड काळामध्ये वातावरण संसर्गजन्य अशुद्ध झाले असून विमानतळ इमारत व परिसरातील वातावरण आणि हवा शुद्ध व्हावी या हेतूने हा विधी केला आहे. याचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी काहीही संबंध नसून वातावरण शुद्धी हाच मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.