वार्ताहर/ सांबरा
सांबरा विमानतळावर कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया एका इलेक्ट्रिशियनने अंडरग्राऊंड पंपहाऊसमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
गुलाबसिंग कृष्णा बिलावर (वय 50) रा. मेन रोड, सांबरा असे मयताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की गुलाबसिंग हा गेल्या काही वर्षांपासून सांबरा विमानतळावर कंत्राटी पद्धतीवर इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी नेहमीप्रमाणे तो नाष्टा करून घरातून बाहेर पडला. पण दुपार झाली तरी आपल्या सहकाऱयांना दिसला नाही व घरीही परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली असता विमानतळावरील अंडरग्राऊंड पंपहाऊसमध्ये ग्रिलला दोरी बांधून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविला. गुलाबसिंग हा भाडोत्री घरामध्ये राहात होता. त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती. पत्नी धुणी-भांडी करून त्याला साहाय्य करत होती तर मुलगाही अलीकडेच कामाला लागला होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मयत गुलाबसिंगच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली व दोन भाऊ असा परिवार आहे.









