बेल्जियममध्ये सांता क्लॉज झालेल्या एका व्यक्तीने 157 जणांना कोरोनाचे संक्रमण दिले आहे. कोरोनाबाधित असलेला व्यक्ती देखभाल केंद्रात नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. या व्यक्तीमुळे तेथे राहत असलेले 121 वृद्ध आणि 36 कर्मचारी कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. देखभाल केंद्रातील 5 जणांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. देखभाल केंद्राला भेट दिल्याच्या 3 दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.
सांता क्लॉज काही सहकाऱयांसह बेल्जियमच्या एन्टवर्प येथील देखभाल केंद्रात पोहोचले होते. या केंद्रात एका मागोमाग एक अनेक कोरोनाबाधित आढळून आल्यावर तेथे राहत असलेल्या सर्वांची आणि कर्मचाऱयांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत 157 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले, तर सांता क्लॉजला सुपरस्पेडर घोषित करण्यात आले आहे. या बाधितांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आहे.
नियमांचे पालन नाही

देखभाल केंद्रासाठी हा अत्यंत खराब काळ आहे. आगामी काही दिवस अत्यंत संकटाचे असतील असे उद्गार स्थानिक महापौर विम कीयर्स यांनी काढले आहेत. देखभाल केंद्राची स्थिती पाहता तेथे नियमांचे पालन करण्यात आले नसावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सांताक्लॉजमुळेच लोक बाधित झाल्याचा संशय आहे. खराब व्हेंटिलेशनही कोरोना फैलावासाठी जबाबदार असल्याचे उद्गार वायरोलॉजिस्ट मार्क वैन रॅन्स्ट यांनी काढले आहेत.









