वार्ताहर / कास :
अतिवृष्टीने सातारा जिल्ह्यातील काही गावे दरडी खाली दबली गेल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या सांडवली गावावरही दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी सांडवली गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरड कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांनी ग्रामस्थांना संभाव्य धोका टळण्यासाठी पाऊस कमी होई पर्यंत तात्पुरते स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रविवारी मुसळधार पाऊस असतानाही तहसीलदार या शासकीय वाहनांने पळसावडे धरणांपर्यंत पोहचल्या. तेथे मोठया प्रमाणात रस्ता खचल्याने त्यांचे वाहन तेथेच थांबले अखेर त्यांनी पळसावडे धरण पायी चालत पार केले .पुढे अडकुन पडलेल्या दुधाच्या पिक गाडीतून प्रवास करत सांडवली गाठली. या गावात पाहणी करून भूस्खलनाचा आढावा घेतला व ग्रामस्थांना पाऊस कमी होईपर्यंत तात्पुरते स्थलांतर होण्याच्या विनंती वजा सुचना केल्या. यावेळी सरपंच गणेश चव्हाण, माजी सरपंच बाबुराव कोकरे, पोलीस पाटील रामचंद्र केरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.