प्रतिनिधी / पणजी
कुंकळ्ळी येथील युनायटेड मरायन प्रोडक्ट या अस्थापनात सांडपाणी निचऱयासाठी जमिनीखाली घालण्यात आलेल्या जलवाहिन्याचे निरीक्षण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रदुषण नियंत्रण मंडळाला मान्यता दिली आहे.
सदर पॅक्टरीत समुद्री प्रक्रिया केली जाते. सांडपाणी वैज्ञानिक पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. पण जमिनीखाली वाहिन्या टाकून बेकायदेशीररित्या सांडपाण्याचा निचरा केला जातो तसेच पंप नलिका बसवून भूगर्भाखालील पाणी बेकायदेशीररित्या वापरले जाते असा आरोप होत होता.
सदर पंपनलिका तात्काळ बंद करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. सांडपाण्याच्या वाहिन्यांची तपासणी करण्यासाठी सरकारी अधिकारी गेले असाता त्यांना रोखण्यात आले होते. सदर अस्थापनाचे बांधकाम पाडण्यासाठी पालिका आणि इतर सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून बाजू मांडण्याची कुठलीच संधी न देता सदर बांधकाम पाडले जाऊ शकते अशी भिती असल्याने दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी खंडपीठाने स्थगिती दिली होती.
सदर स्थगिती असल्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळ निरीक्षण करू शकत नाही असा कयास व्यक्त करून अधिकाऱयांना रोखण्यात आले होते. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने खंडपीठासमोर याचिका सादर करून हा प्रश्न उपस्थित केला होता.









