आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी – पुरुष व महिला संघांचे यश,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने तीनपैकी दोन सुवर्णपदके पटकावली तर एका प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ट्रप सांघिक नेमबाजीत महिला व पुरुष संघांनी भारताला सुवर्ण मिळवून दिले तर 25 मी. रॅपिड फायर सांघिक नेमबाजीत भारताला रौप्य मिळाले. भारताने या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करीत 15 सुवर्ण, 9 रौप्य, 6 कांस्यसह एकूण 30 पदके मिळविली.
पुरुषांच्या सांघिक ट्रप नेमबाजीत भारताचे शॉटगन नेमबाज पृथ्वीराज तोंडाइमन, लक्ष्य शेरॉन, कीनन चेनाय यांनी कझाक संघाचा पराभव करून भारताला सुवर्ण मिळवून देत स्पर्धेची सांगता केली. कझाकच्या व्हिक्टर खासियानोव्ह, मॅक्झिम कोलोमायेट्स, आंद्रे मोगिलेवस्कीय यांनी कतारच्या मोहम्मद अल रुमायही, सईद अबुशरिब व नासिर अली अल हेमैदी यांच्यावर 6-4 अशी मात करून कांस्यपदक मिळविले.
भारताची कझाकवर मात
सुवर्णपदकाच्या लढतीत कझाक संघाने प्रारंभी 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण भारताने मुसंडी मारत बरोबरी साधल्यानंतर कझाकने पुन्हा एकदा आघाडी घेतल्यावर भारतानेही पुन्हा एकदा 4-4 अशी बरोबरी साधली आणि निर्णायक फेरीत भारताने सरस कामगिरी करीत 6-4 असा विजय मिळवित सुवर्णपदकही निश्चित केले. गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीत पृथ्वीराज, लक्ष्य व कीनन यांनी 494 गुण घेतले होते. स्लोव्हाकियाच्या मिचाल स्लॅम्का, फिलिप मेरिनोव्ह, ऍड्रियन ड्रॉब्नी यांनी पात्र फेरीत 498 गुण तर कझाकच्या संघाने 489 गुण घेतले होते. कतारला मात्र 466 गुणच मिळविता आले होते तर यजमान यूएईला 327 गुण मिळविता आले. त्यामुळे कझाक व कतार यांच्यात कांस्यपदकाची लढत झाली. शुक्रवारी झालेल्या वैयक्तिक ट्रप नेमबाजीत कीननला चौथे स्थान मिळाल्याने त्याचे पदक हुकले होते. पण शेवटच्या नेमबाजी प्रकारात त्याने सुवर्ण मिळवित आपल्या मोहिमेची सांगता केली.
महिलांनाही सुवर्ण
महिलांच्या सांघिक ट्रप नेमबाजीत श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर यांनी सुवर्ण मिळविताना अंतिम लढतीत कझाक संघाचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत भारतीय महिला संघाला फारसे सायास पडले नाहीत. सर्सेन्कुल रीस्बेकोव्हा, ऐझन डोस्मागॅम्बेटोव्हा, मारिया दिमित्रीयेन्को या भारताच्या श्रेयसी व मनीषा या अनुभवी नेमबाजांपुढे खूपच कमी पडल्या. भारतीय संघाने क्वचितच फटके चुकवल्याचे दिसून आले. भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीत 321 तर कझाक संघाने 308 गुण नोंदवले होते. शनिवारी श्रेयसी व कीनन चेनाय यांना ट्रप मिश्र सांघिक प्रकारात चौथे स्थान मिळाल्याने त्यांचे पदक हुकले होते.
रौप्यपदकावर समाधान
पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल सांघिक नेमबाजीत मात्र भारताच्या विजयवीर सिद्धू गुरप्रीत सिंग, आदर्श सिंग यांनी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या कीथ सँडर्सनन, जॅक हॉब्सन लेव्हरेट 3, हेन्री टर्नर लेव्हरेट यांनी भारतीय संघावर 10-2 अशी एकतर्फी मात करीत सुवर्ण घेतले. दुसऱया पात्रता फेरीत भारतीय त्रिकुटाने एकूण 552 गुण घेत दुसरे स्थान मिळविताना 184, 178, 190 असे गुण नोंदवले होते. अमेरिकन त्रिकुटाने 571 गुण घेत पहिले स्थान मिळविले होते. पात्रता फेरीत त्यांनी एकूण 868 तर भारताने 857 गुण मिळविले होते.









