अभिजित देसाई यांच्या ‘आप’ प्रवेशाने काँग्रेसला खिंडार, देसाई होते काँग्रेस तिकिटाचे प्रमुख दावेदार
प्रतिनिधी/ सांगे
विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी समीकरणे बदलू लागली आहेत. गोवा प्रदेश किसान काँग्रेसचे निमंत्रक तसेच नेत्रावळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिजित देसाई यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शुक्रवारी आपमध्ये प्रवेश केल्याने सांगे मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले आहे. देसाई हे सांगे मतदारसंघातून काँग्रेस तिकिटासाठी दावेदार होते. त्यांच्यासोबत नेत्रावळी पंचातीच्या अन्य तीन पंचांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाने सांगेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
मुळात सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे काँग्रेस पक्षात आगामी काळात प्रवेश करतील हे काही दिवसांपूर्वी त्यांचे बंधू संदेश गावकर आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून दाखवून दिले होते. तेव्हापासून देसाई हे अस्वस्थ होते. मुळात देसाई हे काँग्रेस तिकिटाचे एक प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्यात दिलजमाई होणे मुश्किल वाटत होते. त्यांनी गावकर यांना तिकीट देण्यास विरोधही दर्शवला होता. त्यावेळी सांगे मतदारसंघातील काँग्रेस गट समिती व प्रमुख कार्यकर्ते देसाई यांच्याबरोबर उभे राहिले होते. सध्या आपण व अन्य तीन पंच विठ्ठल गावकर, संतोष नाईक व सतीश भगत यांनी ’आप’मध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात काँग्रेसचे आणखी कार्यकर्ते प्रवेश करतील, असे देसाई यांनी सांगितले.
काँग्रेसला 1999 पासून बाधलीय बंडाळी
वास्तविक पाहता सावित्री कवळेकर यांनी काँग्रेसचा त्याग केल्यापासून स्थानिक पातळीवर काँग्रेसचे नेते म्हणून देसाई सक्रिय होते. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगे मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार ठरवताना कसरत करावी लागेल असे स्पष्टपणे दिसून येत असताना देसाई यांचा ‘आप’ प्रवेश काँग्रेसला अडचणीत आणणारा आहे. अंतर्गत बंडाळीमुळे 1999 पासून काँग्रेस पक्ष सांगे मतदारसंघात मार खात आला आहे. हा इतिहास आहे. याला केवळ 2017 ची विधानसभा निवडणूक अपवाद ठरलेली आहे. त्यावेळी सावित्री कवळेकर यांच्या विरोधात कुणा काँग्रेसवाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली नव्हती.
प्रसाद गावकर यांना तिकीट देण्यास विरोध
अजून प्रसाद गावकरनी काँग्रेस प्रवेश केलेला नाही. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध नाही. मात्र पक्षश्रे÷ाRनी उमेदवारी देण्यास विरोध आहे. काँग्रेसचे या मतदारसंघात मजबूत जरी संघटन नसले, तरी मतदार आहेत. यावेळी ते एकगठ्ठा काँग्रेसच्या बाजूने राहतात की नाही हे काळच ठरविणार आहे.
नेत्रावळी पंचायतीवर देसाई यांचे वर्चस्व
सध्या ‘आप’मध्ये गेलेल्या देसाई यांचे नेत्रावळी पंचायतीवर वर्चस्व आहे. गत जिल्हा पंचायत निवडणुकीत नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील 6 बुथांमधून त्यांनी 1021, तर भाजपने 914 मते घेतली होती. या पंचायत क्षेत्रात अनुसूचित जमातींची सर्वाधिक मतदारसंख्या आहे. जि. पं. निवडणुकीत काँग्रेस तिकिटावर देसाई यांनी एकूण 3042 मते घेतली होती. त्यांनी काँग्रेसचा त्याग करावा म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दबाव येत होता. त्यामुळे दसऱयानंतर ते काँग्रेसचा त्याग करतील असा अंदाज होता.
तृणमूल, राष्ट्रवादीची दारे ठोठावण्यास प्रारंभ देसाई हे तळागाळातील कार्यकर्त्यांमधून वर आलेले नेतृत्व आहे. ते लोकांशी मिळून मिसळून वावरणारे आहेत. किसान काँग्रेसचे निमंत्रकपद मिळाल्यानंतर त्यांनी शेतकऱयांचे प्रश्न बऱयापैकी हाताळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ‘आप’ प्रवेशाने काँग्रेसचे नुकसान होऊ शकते. पण आताच राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही. येथील काही राजकारणी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दारे ठोठावत आहेत. गणिते जुळली, तर आगामी काळात प्रवेशही होऊ शकतो. तसेच इतर पक्षांचे काही प्रमुख कार्यकर्तेही दुखावले असल्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येणाऱया काळात सांगे मतदारसंघात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच वाडे कुर्डी पंचायतीच्या माजी पंच गौरिशा गावकर, वाडे कुर्डी सरपंच दोमासियो बार्रेटो आणि आता अभिजित देसाई व अन्य तीन पंच यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केल्याने सांगे मतदारसंघात ‘आप’ पकड घेण्यास सुरुवात करणार हे नक्की आहे









