प्रतिनिधी / सांगे
अयोध्येतील राममंदिराचा शिलान्यास कार्यक्रम सांगे विश्व हिंदू परिषद, संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला. सांगे भाजपाने यानिमित्ताने 28 वर्षांपूर्वी अयोध्येला कारसेवक म्हणून गेलेल्या सुमारे 42 जणांचा सन्मान केला.
सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई, मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक, माजी अध्यक्ष सुरेश केपेकर, सरचिटणीस राजेश गावकर यांनी या 42 कारसेवकांच्या घरी भेट देऊन श्रीफळ, शाल आणि पुष्प प्रदान करून त्यांचा सन्मान केला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेक कारसेवकांनी आपले अनुभव सांगितले. सांगे मतदारसंघात रामजन्मभूमी आंदोलनाचे सर्वच कार्यक्रम त्याकाळी मोठय़ा उत्साहात व्हायचे. अगदी तरुण मंडळीही त्यात उत्साहाने भाग घ्यायची.
त्यापूर्वी संघ परिवार, भाजप व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची समन्वय बैठक झाली व त्यामध्ये कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानुसार सांगेतील संघ परिवार, भाजप तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व अन्य हिंदूबांधवांनी घरांवर भगवी गुढी उभारली. तसेच घरांसमोर रांगोळी साकारण्यात आली व मंदिरांमध्ये दुपारी घंटानाद, विद्युत रोषणाईही करण्यात आली. तसेच रात्री दीप प्रज्वलित करण्यात आले. ज्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ नाईक, रा. स्व. संघाचे प्रचारक राहिलेले महादेव राम भाटीकर यांचा समावेश राहिला. राममंदिराचे बांधकाम चालू झाले ही आमच्यासाठी सर्वांत मोठी बातमी आहे, असे अनेक कारसेवकांनी यावेळी बोलून दाखविले.









