विशिष्ट निकषांकवर केंद्रीय गृह खात्याने केली निवड
प्रतिनिधी/ सांगे
सांगे पोलीस स्थानकाला देशातील पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया पोलीस ठाण्याच्या यादीमध्ये पाचवे स्थान प्राप्त झाले आहे. बुधवारी या संदर्भाचे वृत्त प्राप्त झाल्यानंतर सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी गुरुवारी सांगेचे माजी नगराध्यक्ष रूमाल्ड फर्नांडिस यांच्यासह सांगे पोलीस स्थानकाला भेट देऊन पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांच्यासह उपस्थितीत पोलीस कर्मचाऱयांचे अभिनदंन केले.
सांगेसाठी ही अभिमानाची व गौरवास्पद बाब असून पोलिसांचे कार्य उल्लेनीय असल्याचे आमदार गावकर यावेळी म्हणाले.
देशपातळीवर सांगेचे पोलीस स्थानक पाचव्या क्रमांकावर आले आहे. उपलब्ध माहिती नुसार देशातील एकूण 16671 पोलीस ठाण्यापैकी सांगे पोलीस स्थानकाने उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पाचवे स्थान प्राप्त केले आहे. पोर्तुगीजकालीन जुनी वास्तू, लाकडी वासे व कौलारू छप्पर असे स्वरूप असलेल्या या पोलीस स्थानकाची देखभाल करणे अवघड असतानाही वास्तू व सभोवतालचा परिसर नीट नेटका व स्वच्छ ठेवण्यास येथील पोलीस कर्मचारी नेहमीच तत्पर राहिले आहेत. या पोलीस स्थानकात गुन्हय़ांची संख्या नगण्य असूनही या पोलीस स्थानकाची सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानकामध्ये नोंद झालेली आहे.
केंद्रीय गृह खात्याकडून पोलीस स्थानकाची निवड
सर्वोत्कृष्ट मानांकनासाठी मालमत्तेच्या विवादांशी संबंधित गुन्हय़ांची संख्या, महिलांवरील अत्याचार आणि कमकुवत घटकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविणे यासारख्या निकषांवर केली जाते. सांगे पोलीस स्थानकाने वरील निकषांच्या जोरावर देशात पाचवे स्थान पटकावल्याने सांगेतील नागरिकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्तम पोलीस स्थानकाची निवड केली जाते. त्यासाठी खास पथक येऊन पाहणी करून आपला अहवाल गृह मंत्र्यालयाला सादर करीत असते. त्यात पोलीस स्थानकाशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेतला जातो. त्यात पोलीस स्थानकाची निगा, परिसराची स्वच्छता, गुन्हाची नोंद व तपास, कागदपत्रे व त्यांची जपणूक, नागरिकांचे मत आधी मुद्दे विचारात घेतले जाते.
हा तर सांगेचा गौरव : रुमाल्डो फर्नाडिस
सांगेचे माजी नगराध्यक्ष रूमाल्डो फर्नांडिस यांनी सांगे पोलिसांचे अभिनंदन करताना पोर्तुगीजकालीन जुनी वास्तू सांभाळून ठेवणे कठीण काम आहे. सांगेचा गौरव वाढविणारा हा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : गावकर
गुन्हय़ांची संख्या जरी कमी असली किव्हा गुन्हेच होत नाही याचा अर्थ पोलिस स्थानकाची गरज नाही असे नाही. पोलीस हे गुन्हे कमी तसेच नियंत्रणात ठेवण्यास सक्षम आहेत. गोवा पातळीवर पोलिसांनी चांगले कार्य करून पोलीस स्थानकाचा देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आमदार प्रसाद गांवकर यांनी व्यक्त केली आहे.
सांगे तालुका हा मागासलेला अशी प्रतिमा तयार केली जात असली तरी सांगे तालुका कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वी मळकर्णे सरकारी हायस्कूलने सलग दोन वर्षे देशस्तरावर प्रथम येण्याचा मान पटकावलेला आहे याची जाणीव आमदार गांवकर यांनी करून दिली. सांगे पोलीस स्थानकाचे विशेष म्हणजे गुन्हे घडल्यास किंवा एखादे प्रकरण घडल्यास ते मिटविण्यावर भर असतो. वाढते अंमली पदार्थ यावर पोलिसांनी सक्षम राहून कार्य करण्याची गरज आमदार गावकर यांनी व्यक्त केली आहे.
दोन वर्षापूर्वी कुडचडे पोलीस स्थानकाला दहावा तर त्यापूर्वी डिचोली पोलीस स्थानकाला नववा क्रमांक प्राप्त झाला होता.









