प्रतिनिधी/ सांगे
विधानसभा निवडणुकीच्या निकालास अवघे चार दिवस बाकी आहेत. सांगे मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. प्रत्येक उमेदवाराला आपलाच विजय होणार असे वाटत असले, तरी जनता जनार्दनाने कोणाला कौल दिला आहे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांचा बोलबाला असला, तरी सुभाष फळदेसाई भाजपचे कमळ फुलविणार की, प्रसाद गावकर 23 वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा फडकविणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
यंदाची निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधक ठरली आहे. त्यात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. एकूण 26614 मतदारसंख्या असलेल्या सांगे मतदारसंघात केवळ सांगे पालिका तसेच उगे आणि रिवण ग्रामपंचायत क्षेत्रांत सुमारे 13700, तर उर्वरित भाटी, वाडे-कुर्डी, नेत्रावळी, मळकर्णे आणि कावरेपिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रांत मिळून 12864 च्या आसपास मतदारसंख्या आहे. त्यामुळे सांगे, उगे व रिवण क्षेत्रांमधून जो कुणी जास्त मते घेईल त्याचे पारडे जड राहील हे नाकारता येणार नाही. प्रसाद गावकर यांनी काँग्रेस प्रवेश करून काय मिळविले हे निकालानंतरच कळून येणार आहे. सध्या उमेदवार रिलॅक्स मूडमध्ये असून मतमोजणीच्या तारखेकडे टक लावून आहेत.
कवळेकर यांनी बस्तान बसविल्याची चर्चा
सावित्री कवळेकर यांनी बऱयापैकी बस्तान बसविल्याची चर्चा आहे. गेली पाच वर्षे त्यांनी जे कार्य केले ते फळाला येण्याची शक्मयता नाकारता येणार नाही. त्या निवडून आल्या की, मंत्री होणार असाही बोलबाला आहे. खिस्ती समाजाची मते आजवर काँग्रेसबरोबर राहायची, पण यंदा त्यात फूट पडल्याचे जाणवते. काँग्रेसने प्रसाद गावकर यांना तिकीट देताना काँग्रेसची पारंपरिक मते व आपल्या ताकदीवर एसटी समाजाची मते घेऊन ते जिंकतील असा अंदाज बांधला होता. यात ते किती यशस्वी ठरले हे पाहावे लागेल. यंदा 85.69 टक्के मतदान झाले असून एकूण 22975 जणांनी हक्क बजावला आहे.
अन्य उमेदवारांचा प्रभाव किती ?
आपचे उमेदवार अभिजित देसाई, तृणमूलच्या राखी नाईक, आरजीचे सुनील गावकर, अपक्ष रमेश वेलिंगकर यांचा किती प्रभाव राहिला हेही पाहावे लागेल. पाच वर्षांत खुंटलेला विकास, रोजगाराच्या नसलेल्या संधी, उमेदवाराची कार्यक्षमता यापैकी कोणते विषय कामी आले हेही निकालानंतर कळून चुकणार आहे. 1999 पासून भाजपचा गड होऊ पाहणारा सांगे मतदारसंघ 2017 मध्ये भाजपच्या हातून निसटला असला, तरी पुन्हा तो काबिज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
सध्या मतदारसंघात कोण जिंकणार हीच चर्चा चालू आहे. सांगे मतदारसंघ पुन्हा अपक्षाच्या बाजूने उभा राहून महिला उमेदवाराला संधी देणार की, कमळ फुलविणार की, काँग्रेसचा झेंडा फडकविणार हे कळण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल. 2012 च्या निवडणुकीत भाजपचे सुभाष फळदेसाई 483 मतांच्या आघाडीने जिंकले होते. त्यांना 2.25 टक्के मतांची आघाडी मिळाली होती. 2017 च्या निवडणुकीत प्रसाद गावकर हे 937 मतांच्या म्हणजे 4.13 टक्के आघाडीने विजयी ठरले होते. एकंदर सूर पाहता यंदाचा निकाल सर्वांना धक्का देणारा ठरेल अशीच चिन्हे दिसत आहेत.









