दुकानदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी उद्या सांगे बाजार बंदची हाक
प्रतिनिधी / सांगे
नगरपालिका उपसंचालकाने सांगे नगरपालिका मुख्याधिकाऱयाना पाठविलेल्या पत्रात दुकानदारांचे 50 टक्के थकबाकी राहिलेले दुकानभाडे माफ करण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला नसल्याचे कळविले असून त्यावर दुकानदारामध्ये खळबळ माजली असून या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
सांगे व्यापारी संघटनेने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारच्या या निर्णयावर निषेध म्हणून उद्या बुधवार दिनांक 24 फेब्रुवारीला सांगे बाजार बंद ठेवण्याचे ठरविले आहे. सरकारने आमच्यावर हा अन्याय केला असून यापूर्वी मुख्यमंत्री, आमदार, त्यानंतर माजी आमदार तसेच नगर विकास संचालक यांच्या उपस्थितीत बैठक होऊन 50 टक्के थकबाकी रक्कम भरत असाल तर राहिलेली 50 टक्के थकबाकी रक्कम माफ करण्याचे ठरले होते असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितले.
मात्र आत्ता चक्क शिल्लक राहिलेली थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला नसल्याने दुकानदारांवर अन्याय असल्याचे श्री देसाई यांनी म्हटले आहे. सांगे बाजारात दोनशेच्यावर दुकाने 1963 सालापासून आहे. वीस ते पंचवीस वर्षे दर महिन्याला भाडे भरत आलेलो आहोत. कायद्यानुसार पालिकेने तीन वर्षांनी कराराचे नूतनीकरण करून पंधरा टक्के वाढ करावयाची असते. मात्र, पालिकेने तसे न करता पंचवीस वर्षांनी 22 डिसेंबर 2017 मध्ये दुकानदारांना नोटीस पाठवून 15 दिवसाच्या आत थकबाकी रक्कम भरा अन्यथा दुकानांना कुलूप लावले जाईल अशी तंबी दिली. मुळात सांगे बाजाराला अवकळा आली असून ग्राहक नसल्याने दुकानदारांना फटका बसलेला आहे. त्यातच हे नव्याने संकट उभे राहिले आहे असे श्री देसाई यांनी सांगितले.
प्रथम हा विषय तत्कालीन मुख्यामंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडे नेला त्यावर तोडगा काढण्याचे ठरले. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे विषय नेला असता 50 टक्के थकबाकी रक्कम माफ करण्याचे ठरले. त्यामुळे दुकानदारांनी कशीबशी 50 टक्के रक्कम भरली. मुख्यमंत्र्यासमोर ठरल्यानुसार शासकीय पातळीवर योग्य तो निर्णय होणार असे आम्हाला वाटले होते. पण आत्ता पालिका उपसंचालकांनी सांगे नगरपालिका मुख्याधिकाऱयांना पत्र पाठवून सरकारने 50 टक्के थकबाकी भाडय़ाची रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे कळविले आहे अशी माहिती श्री देसाई यांनी दिली आहे.
सर्व दुकानदारांनी रविवारी बैठक घेऊन सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला असून बुधवारी सांगे बाजार बंद ठेऊन निषेध नोंदवण्याचे ठरविल्याचे श्री देसाई यांनी स्पष्ट केले.
समजा नगरपालिका व्यवहार व कर्मचारांचा पगार देणे पालिकेला शक्मय नाही तर सरकारने सांगे नगरपालिकेचे पंचायतीत रूपांतर करण्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी दुकानदारांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे. यावेळी डॉ शंकर नाडकर्णी, डॉ रेवनसिद्ध नाईक, श्री. मराठे, श्री. दिवकर यांच्यासह अनेक दुकानदार हजर होते.









