प्रतिनिधी /सांगे
सांगे मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात जे उमेदवार उतरले आहेत त्यात अपक्ष उमेदवार सावित्री बाबू कवळेकर आणि तृणमूलच्या उमेदवार राखी प्रभुदेसाई नाईक या दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. सांगे मतदारसंघाच्या इतिहासात आजवर कधी महिला आमदार झालेली नाही.
सांगेचा विचार करता महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. महिला मतदारांची संख्या 13899 इतकी आहे. या निवडणुकीत महिलांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रचारकार्यात मोठय़ा प्रमाणात महिला फिरताना दिसून येत आहेत. सावित्री कवळेकर यांचे समर्थक एकदा महिला उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. सांगेसाठी सावित्री या योग्य उमेदवार असल्याचे मीना नाईक यांनी सांगितले.
सांगेतून आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून मतदारांनी एक वेळ संधी द्यावी. निवडून आल्यावर महिलांसाठी गृह उद्योगांची तसेच रोजगारनिर्मिती करण्यावर आपण भर देणार आहे. राजकारण्यांनी महिलांची मते घेतली, मात्र त्यांना काम-व्यवसाय दिला नाही. गेल्या पाच वर्षांतील कामाची पावती जनता आपल्याला देईल, असा विश्वास सावित्री कवळेकर यांनी व्यक्त केला.









