काळजी करू नका… दोन तीन दिवसात बऱ्या व्हाल
प्रतिनिधी / सांगली
सांगली “आता कसं वाटतंय…. काही काळजी करू नका… दोन तीन दिवसात बऱ्या व्हाल…” असं म्हणत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आज्जींना धीर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला संपूर्ण पीपीई कीट घालून आज भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांना भेट देत त्यांची विचारपूस केली व त्यांना मानसिक आधार दिला. दरम्यान वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसह बैठकही घेतली व रुग्णालयातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.
सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. लवकरच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू. इथला प्रत्येक रुग्ण या रोगावर मात करणार व माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Previous Articleलष्कराचा गणवेश घातलेल्या संशयितास मेरठमध्ये अटक
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये ६०१ कोरोनाबाधितांची भर








